शक्तिमान घोड्याला गंभीर मारहाण करून त्याचा एक पाय जायबंदी करणारे भाजपचे आमदार गणेश जोशी यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. प्राण्याला क्रुरपणे मारहाण करून त्याला गंभीर जखमी केल्याचा आरोप जोशी यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
गणेश जोशी यांनी सोमवारी डेहराडून येथील भाजपच्या निदर्शनावेळी पोलिसांच्या घोड्याचा पाय तोडून आपल्या पाशवी वृत्तीचे दर्शन घडवले होते. येथील विधानसभेच्या परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधी निदर्शने सुरू असताना हा प्रकार घडला. यावेळी पोलीस घोड्यावरून कार्यकर्त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हाच गणेश जोशी यांनी पोलिसांच्या घोड्यावर हल्ला केला. त्यानंतर घोड्याला तातडीने नजीकच्या पशुवैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असता घोड्याच्या मागच्या पायाला अनेकठिकाणी झालेल्या फ्रॅक्चर्समुळे त्याचा पाय कापावा लागला होता. शक्तिमान नावाच्या या घोड्याला शस्त्रक्रिया करून कृत्रिम पाय लावण्यात आला आहे. त्याच्यावर अजून पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शक्तिमान पूर्णपणे बरा होण्यास काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
आपल्याला लक्ष्य करण्यासाठीच काँग्रेसने सत्तेचा वापर करून मला अटक केल्याचे गणेश जोशी यांनी पत्रकारांना सांगितले. त्यांना शुक्रवारीच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात अन्यही आरोपींना अटक करण्यात येणार आहे.