भाजप आमदार गणेश जोशी यांनी सोमवारी देहरादून येथील निदर्शनाच्यावेळी पोलिसांच्या घोड्याचा पाय तोडून आपल्या पाशवी वृत्तीचे दर्शन घडवले. येथील विधानसभेच्या परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधी निदर्शनं सुरू असताना हा प्रकार घडला. यावेळी पोलीस घोड्यावरून कार्यकर्त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हाच गणेश जोशी यांनी पोलिसांच्या घोड्यावर हल्ला केला. त्यानंतर घोड्याला तातडीने नजीकच्या पशुवैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असता घोड्याच्या मागच्या पायाला अनेकठिकाणी झालेल्या फ्रॅक्चर्समुळे त्याचा पाय कापावा लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिष रावत यांनी पशुवैद्यकीय रूग्णालयात जाऊन घोड्याच्या प्रकृतीची पाहणी केली. याप्रकरणी गणेश जोशी आणि अज्ञात कार्यकर्त्यांविरोधात नेहरू वसाहत पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे. मात्र, जोशी यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून सरकार मला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. आम्ही शांततेने आंदोलन करत होतो. मात्र, त्याचवेळी घोड्यावर असलेल्या पोलिसांनी त्याठिकाणी अकारण दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या घोड्याने आमच्या अनेक कार्यकर्त्यांना जखमी केले. यामध्ये मुनी नावाच्या कार्यकर्त्याच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याचे जोशी यांनी सांगितले. मी केवळ पोलिसांच्या हातातून दंडुका घेऊन त्या घोड्याला इतर लोकांवर हल्ला करण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न करत होतो, असेही जोशी यांनी सांगितले.
horse-injured