उत्तर प्रदेशातील भाजप आमदाराने माणुसकीचे उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. फर्रुखाबादचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सुनील दत्त द्विवेदी यांनी रस्ते अपघातात जखमी झालेल्या तिघांना मदतीचा हात दिला. द्विवेदी यांनी जखमींना त्यांच्या गाडीतून रुग्णालयात पोहोचवले. मात्र ते एवढ्यावरच थांबले नाहीत. रुग्णालयात स्ट्रेचर कमी असल्याने त्यांनी एका जखमी व्यक्तीला स्वत:च्या पाठीवर घेत उपचारांसाठी आपात्कालीन विभागात दाखल केले.

फर्रुखाबादमधील नेकपूर येथे दोन दुचाकींची धडक झाली. त्यावेळी आमदार सुनील दत्त द्विवेदी तिथून जात होते. अपघातातील जखमी रस्त्यावर पडले असल्याचे पाहताच त्यांनी स्वत:ची गाडी थांबवली. यानंतर त्यांनी सर्व जखमींना गाडीत ठेवून रुग्णालय गाठले. यावेळी रुग्णालयात स्ट्रेचर कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जखमी व्यक्तीची स्थिती गंभीर असल्याने द्विवेदी यांनी त्याला पाठीवर घेतले आणि आपात्कालीन विभागात नेले. थेट आमदार जखमींची मदत करत असल्याचे पाहताच रुग्णालयातील कर्मचारीही कामाला लागले आणि त्यांनी तातडीने जखमींवर उपचार करण्यास सुरुवात केली.

विशेष म्हणजे गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनीही एका अपघातात जखमी झालेल्या पाच जणांना स्वत:च्या गाडीतून रुग्णालयात दाखल केले होते. गेल्या महिन्यात कानपूरमध्ये कार आणि टेम्पोच्या अपघातात ५ जण जखमी झाले होते. त्यावेळी दिनेश शर्मा यांनी स्वत: सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले. ‘अपघातावेळी अनेकजण उपस्थित असूनही कोणीही जखमींच्या मदतीला आले नाही. त्यातील बहुतांश लोक या घटनेचा व्हिडिओ चित्रीत करत होते,’ असे शर्मा यांनी सांगितले होते. अपघात झाल्यानंतर घटनेचा व्हिडिओ चित्रीत करण्यापेक्षा तातडीने जखमींना मदत केल्यास जखमींचे प्राण वाचतील, असे आवाहन या घटनेनंतर शर्मा यांनी केले होते.