अत्यंत नाट्यपूर्ण घडामोडीमध्ये दिल्ली विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते विजेंदर गुप्ता यांना सोमवारी मार्शल्स बोलावून सभागृहातून बाहेर नेण्यात आले. या घटनेमुळे काहीवेळ सभागृहात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.
आठवडभरापूर्वीच्या विषयावरून विजेंदर गुप्ता यांनी आम आदमी पक्षाच्या महिला आमदारांविरूद्ध सभागृहात वाद घालण्यास सुरूवात केल्यानंतर अध्यक्ष राम निवास गोयल यांनी गुप्ता यांना चार वाजेपर्यंत सभागृहाच्या बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, त्यांनी बाहेर जाण्यास नकार दिल्यानंतर अध्यक्षांनी मार्शल्सना सभागृहात बोलावले आणि गुप्ता यांना बाहेर नेण्याचे निर्देश दिले.
मार्शल्सनी गुप्ता यांना बाहेर नेण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यावर त्यांनी स्वतःला सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्व मार्शल्सनी उचलून गुप्ता यांना सभागृहाच्या बाहेर नेले. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया दिल्ली जनलोकपाल विधेयक सभागृहात मांडणार असतानाच हा प्रकार घडला.