भाजप खासदार आणि  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर येत्या शुक्रवारी प्रादेशिक सेनेत (Territorial Army ) दाखल होणार आहेत.  लष्करात दाखल होणारे ते भाजपचे पहिलेच सदस्य आहेत. लेखी परीक्षा आणि चंदीगढ येथे झालेल्या वैयक्तिक मुलाखतीनंतर ठाकूर यांची प्रादेशिक सेनेतील साधारण दर्जाचा अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. अनुराग ठाकूर हे हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथील खासदार आहे. प्रादेशिक सेनेतील साधारण अधिकारी म्हणून त्यांना आता प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. भारतीय लष्कराखालोखाल प्रादेशिक सेना ही दुसरी सुरक्षा यंत्रणेची फळी आहे. या सेनेत सामील होणाऱ्यांना वर्षातून एक महिना लष्करी प्रशिक्षण दिले जाते. आपातकालीन परिस्थितीत या सैन्यबळाचा वापर केला जातो. प्रादेशिक सेनेत दाखल होणाऱ्यांना कोणतेही मानधन मिळत नाही. नागरी सेवेत असणाऱ्यांनाच या सेनेत दाखल करून घेतले जाते. स्वयंरोजगार ही या सेनेत दाखल होण्यासाठीची पूर्वअट आहे. मी प्रादेशिक सेनेत दाखल होण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. माझे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे. मला नेहमीच लष्कराचा गणवेश घालून देशकार्य करण्याची इच्छा होती, अशी प्रतिक्रिया अनुराग ठाकूर यांनी निवडीनंतर व्यक्त केली. अनुराग ठाकूर यांचे आजोबादेखील लष्करात होते. त्यामुळे अनुराग यांनादेखील लष्करात दाखल व्हायचे होते. मात्र, क्रिकेट आणि राजकारणामुळे त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले होते.