योगगुरू बाबा रामदेव यांच्या शिफारसीमुळे लोकसभेची उमेदवारी मिळाल्याचा दावा भाजपचे असनसोलचे खासदार गायक बाबुल सुप्रियो यांनी केला आहे. विमानात बाबा रामदेव यांच्या शेजारी बसल्यामुळे खासदार झालो, असे सांगतानाच भाजपच्या तिकीटवाटप प्रक्रियेत रामदेव बाबा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील व्यक्तींचा हस्तक्षेप सुप्रियो यांनी उघड केला आहे.
 आनंदबझार पत्रिका या बंगाली वृत्तपत्रात सुप्रीयो यांनी हा लेख लिहिला आहे. ते लिहितात: ‘रामदेव हे २८ फेब्रुवारी रोजी विमानातून प्रवास करत असताना आपण त्यांच्या बाजूलाच बसलो होतो. त्यावेळी त्यांची लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या तिकीटवाटपाबाबत कुणासोबत चर्चा सुरू होती. हे ऐकल्यावर ‘मलाही उमेदवारी हवी. अन्यथा तिकीटवाटप प्रक्रियेत तुमचा महत्त्वाचा वाटा आहे असे माध्यमांकडे जाऊन सांगेन,’ असे मी त्यांना गमतीने म्हणालो. त्या वेळी रामदेव यांनी त्यांच्या स्वीय सचिवाला माझा दूरध्वनी क्रमांक घेण्यास सांगितले. त्यानंतर १ मार्च रोजी राकेश नावाच्या संघप्रचारकाने मला दूरध्वनी करून ‘रामदेव यांनी आम्हाला तुमच्याबद्दल सांगितले. तुम्ही निवडणुकीत किती पैसे खर्च कराल,’ अशी विचारणा केली. त्यावेळी मी जास्त पैसे खर्च करू शकणार नाही. मात्र, मोदी यांचा चाहता असल्याने मी निवडणूक लढवू इच्छितो, असे आपण त्यांना सांगितल्याचे सुप्रियो यांनी म्हटले आहे. त्यानंतर तीन दिवसांनी रामदेव यांचाच दूरध्वनी आला आणि उमेदवारी निश्चित झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आपण पैसे खर्च करू शकणार नाही, असे रामदेव बाबा यांना सांगितले, तेव्हा हसून त्यांनी भाजप त्याची काळजी घेईल, असा दिलासा दिला. मात्र तू ‘पवन मुक्तासन’ शिकले पाहिजे, असे वचन दे, असे रामदेव गमतीने म्हणाल्याचे सुप्रियोंनी नमूद या लेखात म्हटले आहे. या लेखाचा दुसरा भाग येत्या रविवारी प्रसिद्ध होणार असून तो अधिक रंजक असेल, असा दावाही सुप्रियो यांनी केला आहे.