दिल्लीच्या न्यायालयाने भाजप खासदार के. सी. पटेल यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. के. सी. पटेल यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत. तर संबंधित महिलेने फसवणूक केल्याचे पटेल यांनी म्हटले आहे. न्यायालयाने सोमवारी या प्रकरणात नॉर्थ अॅव्हेन्यूच्या एसएचओकडून कारवाईबद्दलची माहिती मागवली आहे. यासोबतच या प्रकरणाच्या तपासासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचेही आदेश दिले आहेत.

संबंधित महिलेने जाळ्यात फसवले असल्याचे भाजप खासदार के. सी. पटेल यांनी म्हटले आहे. ‘वलसाडचे खासदार असलेल्या के. सी. पटेल यांनी त्यांच्या ३ मार्चला निवासस्थानी जेवणाच्या बहाण्याने बोलावून बलात्कार केला,’ असा आरोप महिलेने केला आहे. याआधीही के. सी. पटेल यांना आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेण्यास नकार दिला, असेही महिलेने सांगितले. ‘या प्रकरणाची वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी पटेल यांनी दिली होती,’ असेदेखील महिलेने सांगितले.

‘संबंधित महिलेने अंमली पदार्थ देऊन शुद्धीत नसताना आपत्तीजनक व्हिडिओ तयार केला,’ असा आरोप पटेल यांनी महिलेवर केला आहे. ‘संबंधित महिलेने ५ कोटींची मागणी केली होती. मात्र ५ कोटी रुपये देण्यास नकार दिल्यानेच महिलेने बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली होती’, असे पटेल यांनी म्हटले. पटेल यांच्या तक्रारीनंतर महिलेविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.