दिल्लीमध्ये ‘आप’ सरकारने सुरू केलेल्या सम-विषम वाहन योजनेचा विरोध करण्यासाठी बुधवारी भाजपच्या एका खासदार संसदेत चक्क घोड्यावरून आल्याचे पहायला मिळाले. भाजपचे खासदार प्रसाद शर्मा यांनी घोडा प्रदुषणमुक्त वाहन असल्याचे सांगत ‘आप’ सरकारला टोलाही लगावला. प्रसाद शर्मा यांची ही कृती आज संसदेत चर्चेचा विषय ठरली होती.
‘आप’ सरकारने सम-विषम योजना अंमलात आणण्याचे ठरवल्यापासूनच कामकाजात व्यत्यय येईल, असे सांगत खासदारांनी त्यांना या योजनेतून वगळण्याची मागणी केली होती. मात्र, ‘आप’ सरकारने ही मागणी फेटाळत खासदारांना दिल्ली परिवहन मंडळाच्या वातानुकूलित बसने प्रवास करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, गैरसोयीचे कारण देत आत्तापर्यंत बहुतांश खासदारांनी या बसने प्रवास करणे टाळले होते. काही दिवसांपूर्वीच खासदार परेश रावल यांना सम-विषम योजनेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड भरावा लागला होता. तर, खासदार विजय गोयल यांनी काही दिवसांपूर्वी जाणुनबुजून सम-विषम योजनेचे उल्लंघन केले होते. त्यांनी सम-विषम योजनेचा निषेध करणारी पत्रके आणि घोषणा वृत्तपत्रांतील कात्रणे लावलेली गाडी संसदेत आणून त्यांनी ‘आप’ सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविला होता.