जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट गोमांसाचे (बीफ) सेवन करत असल्यामुळेच त्याला ऑलिम्पिकमध्ये ९ सुवर्णपदके जिंकता आली, असा अजब दावा भाजप खासदार डॉ. उदित राज यांनी केला आहे. भाजपमधील दलित चेहरा म्हणून ओळख असलेल्या उदित राज यांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरून गोमांस सेवनाचे समर्थन करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. उसेन बोल्ट गरीब होता. मात्र, प्रशिक्षकाने बोल्टच्या आयुष्याला कलाटणी दिली. प्रशिक्षकांनी बोल्टला बीफ खाण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच बोल्टने ऑलिम्पिक स्पर्धेत ९ सुवर्णपदकं आपल्या नावावर केली, असे उदित राज यांनी म्हटले आहे. बीफमधून प्रोटीन मिळते. त्यात चुकीचे काय आहे. भाजप कधीच काय खावे याविरोधात नाही. भारतीय खेळाडूंनाही प्रशिक्षकांनी बीफ खाण्याचा सल्ला दिला पाहिजे, असे सांगत त्यांनी बीफ खाण्याचे समर्थन केले आहे. अॅथलिटसना चांगल्या सुविधा मिळत नसल्याने त्याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर होतो, असा जो आरोप होतो आहे, त्याबाबत उदित राज यांना प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना उदित राज यांनी म्हटले की, सर्वकाही सुविधांवर अवलंबून नाही. यश मिळविण्यासाठी समर्पण, चिकाटीही तेवढीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. जमैकात वाईट पायाभूत सुविधा असूनही बोल्टने ९ सुवर्णपदके जिंकली. भारतीय खेळाडुंनीही अशाचप्रकारे जिंकण्याचा मार्ग शोधला पाहिजे. परिस्थिती आणि सरकारला दोष देण्यापेक्षा खेळाडुंनी जिंकण्यावर भर दिला पाहिजे, असेही उदित राज यांनी म्हटले.