अयोध्येत राम जन्मभूमीवर राम मंदिर उभारावे हा आमचा संकल्प आहे. मग कोणतेही सरकार येवो अथवा जावो. अयोध्येत राम मंदिर बनवणारच. त्यासाठी कोणताही समझोता होणार नाही, असे भाजपचे खासदार विनय कटियार यांनी ठासून सांगितले. हाथरसमध्ये पक्षातर्फे काढण्यात आलेल्या परिवर्तन यात्रेत कटियार बोलत होते. उत्तर प्रदेशचे दुरवस्था झाली आहे. ती सुधारण्यासाठी विकासाच्या दिशेने वाटचाल करा, असे आवाहनही त्यांनी राज्यातील जनतेला केले.

कटियार म्हणाले, की ‘ कोणतेही सरकार असो, अयोध्येत राम जन्मभूमीवर राम मंदिर उभारण्याचा आमचा संकल्प आहे. मग त्यासाठी कोणताही समझोता करणार नाही.’ रामराज्य येईल, असे काम करण्याची गरज आहे. जेणेकरून देशात समान नागरी आचारसंहिता लागू होईल. सर्वोच्च न्यायालयाचेही असेच मत आहे, असेही कटियार यांनी सांगितले. आपली भाषा उर्दू असो की हिंदू, भाषेच्या नावावर विभाजन होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी तोंडी तलाकच्या मुद्द्यावरही भाष्य केले. तीन वेळा तलाक म्हटले म्हणजे नाते संपत नाही. मुस्लिम महिलांवर अशा प्रकारचा अन्याय होता कामा नये, असे ते म्हणाले. भाजप सरकार आल्यानंतर गुडाराज पूर्णपणे संपून टाकण्याचे काम करण्यात येईल. सर्वांसाठी एकच कायदा असेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी जनतेला दिले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही सडकून टीका केली. राज्यातील जनतेचे शोषण होत आहे. त्यापासून त्यांची सुटका व्हायला हवी. कल्याण सिंह यांनी राज्यात सर्वांना न्याय आणि सर्व ठिकाणी विकासाची गंगा आणली होती. जेव्हा भाजपचे सरकार होते त्यावेळी विकासाची कामे गतीने होत होती, असेही ते म्हणाले.

भाजपचे नेते एस. पी. बघेल यांनीही सरकारवर हल्लाबोल केला. उत्तर प्रदेशातील सरकार जनतेच्या विरोधात आहे. त्यामुळेच भाजपला परिवर्तन यात्रा काढावी लागली, असे ते म्हणाले. विकासाच्या बाबतीत उत्तर प्रदेश १९ व्या स्थानी आहे. राज्य विकास दर, शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज याबाबतीत मागासलेला आहे. भाजपची ही परिवर्तन यात्रा सत्ताबदलाबरोबरच व्यवस्थेतही बदल घडवून आणण्यासाठी आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.