पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद आदर्श ग्राम योजना सुरू केल्यानंतर आता गुजरातमध्ये भाजपच्या काही खासदारांनी विकसित गावेच विकासासाठी दत्तक घेतल्याचा दावा काँग्रेसने केला आहे पण खासदारांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
    चांगल्या पायाभूत सुविधा असलेली गावे दत्तक घेतल्याची तीन प्रकरणे पुढे आली असून खासदारांनी मात्र ती दत्तक घेण्यावर माघार घेण्यास नकार दिला आहे. राज्यसभा खासदार मनसुख मांडविया यांनी भावनगर जिल्ह्य़ातील गढ्ढा तालनकुयातील उगामेडी हे गाव संसद आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतले आहे.
उगमेडीचे सरपंच विनुभाई अंगद यांनी सांगितले, की हे गाव पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहे कारण तेथे काही नद्यांची जोडणी करण्यात आली आहे. गावक ऱ्यांना हिरे उद्योग व कृषी कामातून चांगले उत्पन्न मिळत आहे, सोनल व केरी या नद्या आम्ही जोडल्या, त्यासाठी ९० लाख रुपये खर्च आला व नंतर धरण बांधले, हिरे उद्योगात गावाने मोठी प्रगती केली असून तेथे हिरे कापण्याचे १०० उद्योग आहेत. गावातील पायाभूत सुविधांबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, की त्या आम्हीच विकसित केल्या. खासदार मनसुख मांडवीय यांना आम्हीच हे गाव दत्तक घेऊन आदर्श गाव बनवण्यास सांगितले आहे.
कच्छ लोकसभा मतदारसंघातील खासदार विनोद चावडा यांनी जिल्ह्य़ातील रापड तालुक्यात असलेले सुवाई गाव दत्तक घेतले आहे तेथे २४ तास वीज आहे. सरपंच सुवई मोतीलाल बचाऊ यांच्या मते लोकांना इसबगोल व मोहरीतून चांगले उत्पन्न मिळते. रस्ते, वीज, आरोग्य केंद्रे, शाळा सगळे आहे पण नर्मदेचे पाणी मिळत नाही पाइपलाइन आहेत पण पाणीपुरवठा सुरू झालेला नाही, असे बचाऊ सांगतात. संसद आदर्श ग्राम योजनेबाबत विचारले असता ते म्हणाले, की त्याबाबत माहिती आहे पण खासदारांनी आता आदर्श गाव म्हणून विकास करावा. भाजपचे नेते त्यांच्या पक्षश्रेष्ठींप्रमाणेच फसवणूक करून लोकांची दिशाभूल करीत आहेत, ज्या १२ वर्षांत त्यांच्या श्रेष्ठींनी केल्या, ते सत्य लपवून खोटय़ा गोष्टी मोठय़ा करून सांगत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते मनीष दोशी यांनी केली. त्यांच्या खासदारांनी कमी विकसित गावे घेऊन ती विकसित करावीत, असे मत त्यांनी व्यक्त केले.