जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पीडीपी आणि भाजपमध्ये सुरू असलेली चर्चा फलदायी ठरण्याची लक्षणे दिसत आहेत. एएफएसपीए आणि कलम ३७० असे एक-दोन प्रश्न वगळता जवळपास अन्य सर्व प्रश्नांबाबत दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचे कळते.
तथापि, दोन्ही पक्षांची आघाडी होऊन सरकार कधी स्थापन होईल, यावर भाष्य करण्यास दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी नकार दिला. सरकार स्थापन होण्याच्या प्रक्रियेत अडसर ठरणाऱ्या एक-दोन प्रश्नांवर मतैक्य होण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे पीडीपीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
एक-दोन मुद्दय़ांचा अपवाद वगळता बहुतेक प्रश्नांवर मतैक्य झाले आहे. दोन्ही पक्षांकडून त्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असे पीडीपीचे प्रवक्ते नईम अख्तर यांनी सांगितले. मतभेदांचे मुद्दे सामंजस्याने सोडविण्यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रामाणिक प्रयत्न केले जात आहेत, असेही ते म्हणाले.
काही प्रश्नांबाबत मतैक्य झाले की सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग येईल, असे भाजपनेही म्हटले आहे. दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक आणि रचनात्मक चर्चा सुरू असल्याचेही पक्षाने स्पष्ट केले आहे.

पीडीपीशी आघाडी भाजपने टाळावी-गोविंदाचार्य
भाजपचे माजी नेते आणि विचारवंत गोविंदाचार्य यांनी मात्र दोन्ही पक्षांमधील कोणतीही आघाडी अनैतिक असेल असे म्हटले आहे.अल्प मुदतीचा लाभ मिळविण्यासाठी भाजपने अशा प्रकारच्या प्रक्रियेपासून दूर राहावे, दोन्ही पक्षांमध्ये आघाडी झाल्यास ती अनैतिक आणि तत्त्वांना हरताळ फासणारी ठरेल, असे गोविंदाचार्य म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या हेतूबद्दल आपल्या मनात शंका नाही, मात्र त्या सरकारच्या धोरणांना आपली हरकत आहे. देशाला गरिबांच्या उद्धाराची धोरणे हवी आहेत, मात्र सरकारची धोरणे धनिकधार्जिणी आहेत, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना गोविंदाचार्य म्हणाले.