भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली. आम्ही आमच्या ३ वर्षांच्या कामाचा हिशोब देण्यासाठी तयार आहोत. राहुल गांधींनी आपल्या ३ पिढ्यांच्या कामाचे उत्तर द्यावे, असे आव्हानच शहा यांनी दिले आहे. डेहाराडून दौऱ्यावर आलेले शहा हे भाजप कार्यकर्त्यांसमोर बोलत होते.

ते म्हणाले, नरेंद्र मोदी सरकारने देशात पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मंस (राजकारणात काम करण्याचे युग) सुरू केले आहे. २०१४ मध्ये आम्ही सत्तेत आलो. सध्याच्या स्थितीची तुलना केल्यास तुम्हाला मोठे परिवर्तन झाल्याचे दिसून येईल. आम्ही देशात पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सच्या नव्या युगाची सुरूवात केली आहे.

पूर्वीच्या यूपीए सरकारने १२ लाख कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला. मागील ३ वर्षांत भाजप सरकार देशात पारदर्शी कारभार करण्यात यशस्वी ठरले आहे. देशाच्या चारही बाजूला एक मोठा बदल दिसत असून याचे सर्व श्रेय नरेंद्र मोदी यांना जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली नोटाबंदी, बेनामी संपत्तीवर टाच, जीएसटी आणि काळ्या पैशांची संमातर अर्थव्यवथा नष्ट करण्याचे काम करण्याबरोबरच देशात डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी प्रयत्न करण्यात आला असे ते म्हणाले.

आर्थिक सुधारणा आणि सर्जिकल स्ट्राईकसारख्या रणनीतीविषयक निर्णयांमुळे विदेशात भारताची एक मजबूत इच्छाशक्ती असलेला देश म्हणून ओळख बनली आहे. भारताचा एक ब्रँड बनवण्यात हे सरकार यशस्वी झाले असल्याचे त्यांनी म्हटले.