भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय यांच्या कंपनीची उलाढाल एका वर्षात १६ हजार पटींनी वाढल्याचे वृत्त देणाऱ्या न्यूज वेबसाईटविरोधात १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. वेबसाईटचे वृत्त निराधार, चुकीचे आणि शहा कुटुंबियांची प्रतिमा मलिन करणारे असल्याने हा दावा दाखल केल्याचे जय शहा यांनी म्हटले आहे.

‘द वायर’ या न्यूजवेबसाईटने अमित शहा यांचे पुत्र जय यांच्या ‘टेम्पल इंटरप्रायझेस लिमिटेड’ या कंपनीशी संबंधित वृत्त दिल्याने देशभरात खळबळ निर्माण झाली आहे. कंपनी निबंधकाकडे केलेल्या नोंदणीनुसार जय शहा यांच्या कंपनीने नफा कमवायला सुरुवात केल्याचे वृत्तात म्हटले होते. कंपनीला मार्च २०१३, मार्च २०१४ मध्ये अनुक्रमे ६, २३० रुपये आणि १, ७२४ रुपयांचा तोटा झाला होता. तर २०१४-१५ मध्ये १८ हजार रुपयांचा नफा झाला.  मात्र २०१५- १६ मध्ये कंपनीची उलाढाल ८० कोटी रुपयांवर पोहोचल्याचे कागदपत्रांवरुन उघड झाले.

जय शहा यांच्या कंपनीची उलाढाल एका वर्षात १६ हजार पटींनी वाढल्याचे समोर आल्यानंतर काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि अन्य विरोधी पक्षांनी अमित शहांना लक्ष्य केले होते. याप्रकरणावर अखेर जय शहा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘संबंधित वृत्त हे निराधार, चुकीचे आणि बदनामी करणारे आहे. वडिलांच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे मला व्यवसायात ‘नफा’ झाल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण माझ्या कंपनीचे सर्व व्यवहार कायदेशीर असून बँकेद्वारेच सर्व व्यवहार झाले आहेत, असा दावा त्यांनी केला.

मी सहकारी बँकांमधून कर्ज घेतले होते आणि हे कर्ज मी फेडले आहे. कर्जासाठी मी माझी संपत्तीदेखील गहाण ठेवली होती, असे जय शहा यांनी म्हटले आहे. मी संबंधित कंपनीला सर्व कागदपत्रे पाठवली आहेत. त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आम्ही दिले आहे. न्यूजवेबसाईटने दिलेले वृत्त चुकीचे असून यामुळे माझी बदनामी झाली. आम्ही बातमी देणारी पत्रकार, न्यूजवेबसाईटचे संपादक आणि मालक यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा खटला दाखल करत आहोत, असे जय शहा यांनी स्पष्ट केले. अहमदाबादमधील न्यायालयात दावा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.