आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी केलेल्या तडजोडीत पीडीपी व भाजप या दोन्ही पक्षांनी वादग्रस्त मुद्दय़ांवर आपापली भूमिका मवाळ करून जम्मू-काश्मीरच्या वेगळ्या दर्जाबाबत ‘जैसे थे’ स्थिती राखण्याचे आणि सशस्त्र दल विशेषाधिकार कायद्याबाबत फेरविचार करण्याचे आश्वासन दिले आहे.
‘आघाडीचा कार्यक्रम’ या नावाचा दोन्ही पक्षांचा समान किमान कार्यक्रम (सीएमपी) मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी शपथविधी समारंभानंतर पत्रकार परिषदेत जाहीर केला. पाकव्याप्त काश्मीरसोबत प्रवास आणि व्यापार यांना प्रोत्साहन देण्यासाठी नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूला असलेल्या लोकांचा परस्पर संपर्क वाढवण्याकरता विश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याचा निश्चयही यात करण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरच्या घटनात्मक दर्जाबाबत भाजप व पीडीपी या दोन्ही पक्षांची भूमिका वेगळी असली, तरी राज्याला विशेष दर्जा देणाऱ्या घटनेतील कलम ३७० सह सर्व तरतुदींबाबत सध्याची स्थिती कायम राखली जाईल, असे म्हटले आहे. भाजप अनेक वर्षांपासून हे कलम रद्द करण्याची मागणी करत आलेला आहे.
सशस्त्र दल विशेषाधिकार कायद्याबाबतही  दोन्ही पक्षांची पूर्वीपासून वेगळी भूमिका राहिलेली असली, तरी राज्यातील ‘अशांत क्षेत्रांना’ डी-नोटिफाय करण्याची आवश्यकता नवे सरकार पडताळून पाहणार आहे.

सईद मंत्रिमंडळाचा शपथविधी
पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचे ज्येष्ठ नेते मुफ्ती मोहम्मद सईद यांनी रविवारी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपने कलम ३७० बाबत ‘जैसे थे’ स्थिती राखण्याचे मान्य करून आपली या विषयावरील भूमिका बदलल्यामुळे पीडीपी व भाजप यांच्या आघाडीचे सरकार राज्यात सत्तारूढ होऊ शकले.राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी सईद यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ७९ वर्षांचे सईद नऊ वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. सईद यांच्यासह पीडीपीच्या १३ आणि भाजपच्या १२ मंत्र्यांनीही शपथ घेतली. भाजपचे निर्मल सिंह हे उपमुख्यमंत्री झाले असून, हुर्रियतचे नेते सज्जाद लोन यांना भाजपच्या कोटय़ातून मंत्री करण्यात आले आहे.

काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सचा बहिष्कार
जम्मू विद्यापीठाच्या झोरावर सिंह सभागृहात नव्या सरकारचा शपथविधी झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप अध्यक्ष अमित शाह, पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरलीमनोहर जोशी, पक्षाचे सरचिटणीस राम माधव आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे शपथविधी समारंभाला उपस्थित होते. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचे बहुतांश नेते व आमदार यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता, मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सैफुद्दीन सोझ या वेळी हजर होते.
शपथ घेणारे  मंत्री  : अब्दुल वीरी, हसीब द्राबू, नईम अख्तर, बशरत बुखारी व आसिया नक्काश (सर्व पीडीपी) आणि लाल सिंह, चंद्र प्रकाश, सुखनंदन चौधरी, बाली भगत व प्रिया सेठी (सर्व भाजप).

‘ऐतिहासिक संधी’
नवी दिल्ली: जम्मू व काश्मीरच्या जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी पीडीपी-भाजप युतीला  ऐतिहासिक संधी असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वात राज्याची वेगाने प्रगती होईल, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.