फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या भेटीसाठी ‘दूत’ पाठविल्याचे वृत्त भारतीय जनता पक्षाने (भाजप) शनिवारी फेटाळले. काश्‍मीरप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आपल्याकडे यांच्याकडे मदत मागितल्याचा दावा गिलानी यांनी केला होता. मात्र, हा गिलानी यांचा खोडसाळपणा असल्याचे सांगत या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे भाजपने सांगितले. ‘काश्‍मीरप्रश्‍नी चर्चा करण्यासाठी भाजपच्या कोणत्याही प्रतिनिधीने गिलानी यांची भेट घेतलेली नाही किंवा भेट घेण्याचा प्रयत्नही केलेला नाही,’ असे पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.
यावेळी सय्यद अली गिलानी यांच्याकडून काश्मीर प्रश्नाबाबत सातत्याने घेण्यात आलेल्या नकारात्मक भूमिकेवर भाजपने टीका केली. तसेच गिलानी यांनी केलेल्या आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावेत अन्यथा त्यांनी देशातील जनतेची माफी मागावी असे भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.