बिहारमध्ये कायद्याचे राज्य आहे हे सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्य़ांत हात असलेल्या जद (यू) आमदारांविरोधात कारवाई करावी, असे आव्हान भाजपने मंगळवारी ‘बिचाऱ्या’ मुख्यमंत्र्यांना दिले.

बिहारमध्ये जद (यू), राजद आणि काँग्रेस धर्मनिरपेक्ष आघाडीचे राज्य आल्यानंतर गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. सत्तारूढ आघाडीच्या अनेक आमदारांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत तरीही त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आघाडीत नितीशकुमार यांची ‘बिच्चारे मुख्यमंत्री’ अशी अवस्था झाली आहे, असे भाजपचे नेते सुशील मोदी यांनी म्हटले आहे.

यापूर्वी जनता लालूप्रसाद यांच्यामुळे राजदला घाबरत होती, मात्र आता जद(यू) आमदारांनीही मुक्तपणे बळाचा वापर सुरू केला आहे, असेही मोदी म्हणाले. जद (यू)च्या एका महिला आमदारांचा पती पोलीस कोठडीतून पसार झाला तर अन्य एकाविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे.