मोदी सरकारला सत्तेत येऊन आज तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जल्लोष सुरु आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने अपेक्षेप्रमाणे मोदी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. देशभरात विविध ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदांमध्ये मोदी सरकारचे अपयश अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यापैकी दिल्लीमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते कमल नाथ यांनी मोदी सरकारवर टीका केली. ‘भाषण और आश्वासन, यही है मेरा शासन’ अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारच्या तीन वर्षाच्या कारकिर्दीचे वर्णन केले. तसेच मोदी सरकारच्या वर्षपुर्तीच्या सोहळ्यासाठी भाजपकडून दोन हजार कोटी रूपये खर्च करण्यात आल्याचा आरोपही कमल नाथ यांनी केला. तेव्हा भाजप आता या आरोपाला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार हे पाहणे, औत्सुक्याचे ठरेल.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: तीन वर्षांच्या कालावधीत सरकारने केलेल्या कामांची माहिती देणारे ग्राफिक्स ट्विट केले आहे. त्यासोबत त्यांनी एक नवी घोषणाही दिली आहे. ‘साथ है, विश्वास है…हो रहा विकास है!’ अशी ही नवी घोषणा आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या नव्या घोषणेचे स्वागत केले आहे.

तत्पूर्वी कालच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना आक्रमक अपप्रचार हाच मोदी सरकारचा एकमेव अजेंडा असल्याचे म्हटले होते. एखाद्या गोष्टीवरून लोकांचे लक्ष हटवणे, अपप्रचार करणे, तथ्यांची तोडमोड करणे, असहिष्णुता, राजकीय विरोधकांची खिल्ली उडवणे आणि लोकांच्या शहाणपणाविषयी शंका घेणे या गोष्टी मोदी सरकारच्या अपप्रचार धोरणाचा भाग आहेत. तसेच केवळ एका व्यक्तीच्या प्रतिमानिर्मितीसाठी सरकारी तिजोरीचा वापर केला जात आहे. भाजपसाठी हा मोदी उत्सव आहे. मात्र, यामध्ये मला देशातील गरीब, बेरोजगार आणि शेतकऱ्यांचा कुठेही सहभाग दिसत नसल्याचे शर्मा यांनी म्हटले होते.