रोहिंग्या शरणार्थींबाबत भारत सरकारने आपला दृष्टीकोन भलेही स्पष्ट केला असला तरी भाजपमध्ये मात्र यावरून मतभेद असल्याचे समोर आले आहे. सरकारच्या धोरणाविरोधात जात भाजप खासदार वरूण गांधी यांनी ‘नवभारत टाइम्स’ या वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात रोहिंग्या शरणार्थिंना भारतात राहू दिले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. वरूण गांधींच्या या लेखावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी त्यांच्यावर टीका करत त्यांच्या देशप्रेमावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वरूण गांधींच्या या लेखावरून राजधानीत खळबळ उडाली असून अहिर यांच्या प्रतिक्रियेवरही उलटसुलट प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वरूण गांधी यांनी आपल्या लेखात काही जुन्या उदाहरणांचा हवाला देत म्हटले की, भारताला रोहिंग्या शरणार्थिंना आसरा देणे गरजेचे आहे. आतिथ्य आणि शरण देण्याच्या परंपरेचे पालन करत रोहिंग्यांना शरण देणे यापुढेही जारी ठेवले पाहिजे.

दरम्यान, रोहिंग्यांप्रती वरूण यांचे नरमाईचे धोरण सरकार आणि पक्षाला पटलेले नाही. गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी तर कोणत्याही देशभक्ताला असं वाटू शकत नसल्याचे म्हटले. जो देशभक्त असेल.. देशाच्या हिताचा विचार करेल. तो अशाप्रकारचे वक्तव्य कधीच करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले. वरूण गांधी यांना याप्रकरणी पक्षाला उत्तर द्यावे लागण्याची शक्यता आहे. परंतु, भाजपकडून अधिकृतरित्या यावर काहीही भाष्य करण्यात आलेले नाही. सध्या वरूण हे पक्षावर नाराज असल्याचे सांगण्यात येते. हा लेख त्या नाराजीचाच भाग असल्याचेही बोलले जाते.

वरूण यांनी या मुद्द्यावरून काही उपायही सुचवले आहेत. भारताने एक राष्ट्रीय शरणार्थी नीति बनवण्याची गरज आहे. या नीतिअंतर्गत छळाला कंटाळून पळणारे आणि गरिबीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या शरणार्थींमध्ये अंतर असावे. त्याचबरोबर ज्या भागात शरणार्थींची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. तिथे तणाव आणि भेदभाव कमी करण्यासाठी स्थानिक संस्थांनी पुढे येऊन घर मालक आणि स्थानिक संघटनांना संवेदनशील करण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp splits on the issue of rohingyas hansraj ahir question on varun gandhis patriotism
First published on: 26-09-2017 at 16:47 IST