राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून राष्ट्रपतिपदासाठी रामनाथ कोविंद यांनी आज संसदेत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे सर्व दिग्गज नेते आणि मंत्री उपस्थित होते. यावेळी भाजपचे प्रवक्ते संबित पात्राही उपस्थित होते. त्यांनी कोविंद यांनी राष्ट्रपतिपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एक ट्विट केलं आणि त्यासोबत व्हिडिओही शेअर केला आहे. कोविंद उमेदवारी अर्ज दाखल करत असताना ‘देखणे पाहुणे’ही आले होते, असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. इतकंच नाही तर या देखण्या पाहुण्यांचा व्हिडिओ त्यांनी यू-ट्युबवरही अपलोड केला आहे. पण पात्रा यांनी ज्या देखण्या पाहुण्यांचा उल्लेख केला त्यांच्या देखणेपणावर नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले. यामध्ये ‘देखणा’ कोण आहे, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएकडून रामनाथ कोविंद उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. त्यासाठी एनडीएचे सर्व दिग्गज नेते राष्ट्रपती भवनात एकत्र जमले होते. त्याचवेळी उद्यानात एक लांडोर आपल्या पिल्लांसह मुक्तपणे वावरत होती. संबित पात्रा यांनी त्यांच्या मोबाईलवरून या देखण्या पाहुण्यांचा व्हिडिओ शूट केला आणि यू-ट्युबवर अपलोड केला. त्यानंतर हाच व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. कोविंद उमेदवारी अर्ज दाखल करत असताना तेथे काही ‘देखणे पाहुणे’ही आले होते, असं ट्विट त्यांनी केलं. त्यावर काही यूजर्सनं हे कोविंद यांच्या विजयाचे शुभ संकेत असल्याचं म्हटलं तर काहींनी यापैकी देखणा कोण आहे, असा प्रश्न उपस्थित केला. तर काहींनी काश्मीरमधील मशिदीबाहेर पोलीस अधिकाऱ्याची हत्या झाल्याच्या घटनेचा उल्लेख करून भाजपवर टीकास्त्र सोडलं. पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येनंतर सर्व पक्षांच्या नेत्यांनी एका मिनिटाचं मौन बाळगून त्यांना श्रद्धांजली वाहिली असती तर चांगलं झालं असतं, असंही म्हटलं.