राजस्थानमध्ये गेल्या आठवडय़ात झालेल्या ४६ स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या मतदानाचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. ४६ पैकी तब्बल ३१ संस्थांवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे. त्यांपैकी पाच महापालिका असून, ११ नगर परिषदा आणि १५ नगरपालिका आहेत.२२ नोव्हेंबर रोजी राजस्थानमधील जयपूर, कोटा, जोधपूर, बिकानेर, उदयपूर व भरतपूर या महापालिकांसह १८ नगर परिषदो आणि २२ नगरपालिकांसाठी मतदान झाले होते. भरतपूर सोडून अन्य महापालिकांवर भाजपने एकहाती वर्चस्व राखले आहे. भरतपूर महापालिकेत ५० पैकी भाजपचे १८ उमेदवार निवडून आले, तर काँग्रेसला ११ व बसपला एक जागा मिळाली. विशेष म्हणजे येथून २० अपक्ष नगरसेवक निवडून आले असून, कुणाला महापौर करायचे याचा निर्णय ते घेणार आहेत.काँग्रेसने पाच नगरपरिषदा आणि दोन नगरपालिकांवर सत्ता मिळविली आहे. एका नगरपरिषदेवर आणि पाच नगरपालिकांवर कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी तिथे भाजपचेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत.