राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने अ-मराठा नेत्याच्या हाती देणाऱ्या दिल्लीच्या भाजप नेत्यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी मराठा नेत्यांची चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे राज्याच्या प्रदेश अध्यक्षपदावर मराठा समुदायातील नेत्याची वर्णी लागणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार सुभाष देशमुख व मुंबई प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार यांची नावे प्रदेश अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. त्यापैकी रावसाहेब दानवे यांना राज्यमंत्रिपदापेक्षा प्रदेशाध्यक्ष होण्यात अत्याधिक रस असल्याचा दावा सूत्रांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच मर्जीतल्या नेत्यास हे पद मिळेल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
जालन्याचे खासदार व मोदी सरकारमध्ये राज्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणाऱ्या रावसाहेब दानवे यांना राज्यात परतीचे वेध लागले आहेत. राज्यमंत्रिपदामुळे मर्यादित अधिकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिस्तीमुळे वैतागलेल्या दानवे यांनी अलीकडेच पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. आशीष शेलारदेखील प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत; परंतु मुंबईकेंद्रित राजकारण असलेल्या शेलार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यापूर्वी सुधीर मुनगंटीवार व त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रदेशाध्यपदाची धुरा सोपवण्यात आली होती. दोन्ही नेते विदर्भातील असल्याने आता अन्य भागास प्राधान्य देण्याचा पक्षश्रेष्ठींचा विचार आहे. त्यामुळे आमदार सुभाष देशमुख व रावसाहेब दानवे यांच्यापैकी एकाची वर्णी लागू शकते, असे सूत्रांनी स्पष्ट केले. या संदर्भात सुभाष देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी आतापर्यंत पक्षाकडे काहीही मागितलेले नाही. यापुढेही मागणार नाही; परंतु दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे निभावेन. प्रदेशाध्यक्षपदासाठी मी भाजपच्या कुणाही नेत्याला भेटलेलो नाही.