केरळच्या त्रिवेंद्रममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री राजेश नावाच्या आरएसएस कार्यकर्त्यावर धारदार शस्त्रानं १५ वार करण्यात आले, त्याचा डावा हातही कापण्यात आला. यानंतर राजेशला रूग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर पाच लोकांना ताब्यात घेतलं आहे. या सगळ्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येते आहे. मानिकुततन नावाचा एक आरोपी हा राजेशच्या शेजारी राहात होता. त्याच्याविरोधात काही गुन्हे याआधीही दाखल आहेत.

सीपीआयएम कमिटीच्या सदस्याच्या घरावर देशी बॉम्ब फेकल्याप्रकरणीही मानिकुततनविरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश शाखेतून परतत होता त्याचवेळी त्याला ६ जणांनी घेरलं टू व्हिलरवर जात असणाऱ्या राजेशवर धारदार शस्त्रांनी १५ वार करण्यात आले.

राजेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यवाहक या पदावर काम करत होता. राजेशच्या हत्येमागे माकपचा हात आहे असा आरोप भाजपचे प्रदेश अध्यक्ष के.राजशेखरन यांनी केला आहे. मात्र डाव्या पक्षांनी हा आरोप खोडून काढला आहे. या हत्येचा निषेध करत आज केरळमध्ये बंद पाळण्यात आला आहे.

भाजप आणि आरएसएसनं पुकारलेल्या या बंदमुळे लोकांना रेल्वे स्टेशनपर्यंत पोहचण्यासही त्रास होतो आहे. काही जणांनी खासगी वाहनांचा वापर करत स्टेशन गाठलं आहे. तसंच इतर व्यवहार पूर्ण करण्यातही नागरिकांना अडचणी येत आहेत. मात्र ज्याप्रकारे संघ कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे त्याचा निषेध करतच हा बंद पुकारण्यात आला आहे. संपूर्ण केरळमध्ये आज भाजपतर्फे कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे.