भारतीय बहुजन पार्टीच्या सर्वोसर्वा मायावती यांच्यावर अश्लिल टिप्पणी करणाऱ्या दयाशंकर सिंह यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश आणि बिहार पोलिसांनी संयुक्त कारवाई करुन बिहारमधील बक्सर येथून दयाशंकर यांना अटक केली. भाजप पक्षाची उत्तर प्रदेशमधील उपाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर दयाशंकर सिंह यांनी “बसप‘मध्ये होणाऱ्या तिकीट विक्रीवर भाष्य करताना पाचवेळा उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या मायावतींवर असभ्य टिप्पणी केली होती. त्यांनी केलेल्या विधानानंतर संसदेमध्येही तीव्र पडसाद उमटले होते. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत यासंदर्भात माफी मागितली होती. याचवेळी राज्यातील समाजवादी पार्टी आणि भाजप सरकार दयाशंकर सिंह यांचा बचाव करत असल्याचा आरोप मायावती यांनी केला होता. दरम्यान पक्ष कारवाईच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून दयाशंकर यांना उपाध्यक्ष पदावरुन हटविण्यात आले होते. तसेच पक्षातूनही त्यांना निलंबित करण्यात आले. याप्रकरणी उत्तरप्रदेशमध्ये त्यांच्यावर एससी एसटी कायद्याअंतर्गत तक्रार दाखल झाल्यानंतर दया शंकर सिंह फरार होते. दरम्यान, त्यांनी लखनऊ खंडपीठाकडे अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी देखील प्रयत्न केले होते. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती.  दरम्यान, बसप कार्यकर्त्यांनी अपशब्द वापरल्याची तक्रार दयाशंकर यांच्या पत्नी स्वाती सिंह यांनी राज्यपाल राम नाईक यांच्याकडे केली होती. याबाबत पुराव्यांसाठी बसप कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीची सीडी त्यांनी राज्यपालांकडे सादर केली. बसप नेते नसिमुद्दीन सिद्धिकी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलकांनी कुटुंबीयांच्या विरोधात अपशब्द वापरल्याचा दावा स्वाती यांनी केला होता.