देशातील सर्व राज्यांमध्ये लवकरच भाजपची सत्ता येईल, असे विधान भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी केले. ते रविवारी तेलंगणा येथील कार्यकारी समितीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्व राज्यांमध्ये भाजपचे सरकार आणण्यासाठी खूप मेहनत करावी. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारने लोकांच्या कल्याणासाठी विशेषत: पिचलेल्या अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. गरिबांसाठी अनेक बँकेत कोट्यवधी जनधन खाती उघडण्यात आली, असे राम माधव यांनी म्हटले. तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मोदी सरकारने अनेक निर्णायक पावले उचलली. यामध्ये जीएसटी आणि नोटाबंदीसारख्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीय अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी ‘मेक इन इंडिया’सारखे उपक्रम हाती घेतले आहे. या सगळ्याची माहिती जनतेपर्यंत पोहचली पाहिजे. त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली पाहिजे, असा सल्ला राम माधव यांनी दिला.

काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तेलंगणा दौऱ्यात अशाप्रकारचा दावा केला होता. अमित शहा यांनी पक्षाच्या नेत्यांकडे ‘मिशन दक्षिण’ची ब्ल्यू प्रिंट सोपवली होती. या माध्यमातून भाजपची दक्षिणेतील आंध्र पद्रेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या पाच राज्यांमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या या दाव्याची खिल्ली उडवली होती. या विधानाचा समाचार घेताना असदुद्दीन ओवेसी यांनी अमित शहा यांना हैदराबादमधून आपल्याविरुद्ध निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले. तसेच सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघातही भाजपला अस्मान दाखवण्याची काळजी आमचा पक्ष घेईल, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी माझे शब्द लक्षात ठेवावेत. हैदराबादची जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. गोशामहल विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल. तर अंबरपेट, मुर्शिदाबाद, खैरताबाद आणि उप्पलमध्येही भाजपला पराभवाचे तोंड पाहावे लागेल. एकुणच तेलंगणात भाजपचा मोठा पराभव होईल, असा दावा ओवेसी यांनी केला होता.