गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ राष्ट्रपती राजवट संपून दिल्लीकरांना नवरात्रौत्सवात नवीन सरकार मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देण्याच्या नायब राज्यापालांच्या प्रस्तावावर केंद्रीय गृह मंत्रालयाने सहमती दर्शवली आहे. आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा विसर्जित करून नव्याने निवडणूक घेण्याची मागणी केली होती. मात्र विधानसभा विसर्जित करण्यापूर्वी भाजपला एकदा सत्तास्थापनेसाठी संधी द्यायला हवी, या नायब राज्यपाल नजीब जंग यांच्या प्रस्तावावर गृह विभागाने सकारात्मक मत नोंदवले आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात सत्तास्थापनेचा अंतिम निर्णय होईल.
राष्ट्रपती सचिवालयाने गृह मंत्रालयाकडून या प्रस्तावावर मत मागितले होते. गृह मंत्रालयाने सकारात्मक मत नोंदवून हा अहवाल राष्ट्रपती सचिवालयास पाठवला आहे. दिल्लीत सत्तास्थापनेची शक्यता निर्माण झाल्याने भाजप गोटात उत्साह तर आम आदमी पक्षाचे नेते अस्वस्थ झाले आहे. विशेष म्हणजे येत्या १० ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत दिल्ली विधानसभा विसर्जित करण्यावर अंतिम निर्णय होणार आहे. सुनावणीदरम्यान दिल्ली व केंद्र सरकारला सत्तास्थापनेवर भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. दिल्ली प्रभारी प्रभात झा व प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत विस्तृत चर्चा केली. भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरलेला नाही. मात्र प्रा. जगदीश मुखी यांना भाजप विधिमंडळाचा नेता निवडून त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.  
काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे तीन आमदार एकाच दिवशी गोव्याला रवाना झाले होते. त्यामुळे आपमध्ये एकच खळबळ माजली होती. भाजप आपच्या आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न करीत असला तरी गोव्याला गेलेल्यांचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याची खात्री पटल्यावर अरविंद केजरीवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.