भाजपच्या कोणत्याही सभेमध्ये ‘भारतमाता की जय’ आणि ‘वंदे मातरम’चा जयघोष असतोच असतो.. पण काही दिवसांपूर्वी हाच जयघोष जेव्हा अनंतनागच्या महिला मेळाव्यामध्ये घुमला; तेव्हा काहींना धडकी भरली, तर काहींची छाती गर्वाने फुलली..

धडकी यासाठी की काश्मिरी दहशतवादी कारवायांचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमध्ये ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा देणे धाडसाचे काम. पण ती हिंमत दाखविली भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी. दहशतवादाच्या सावटाखालील अनंतनागमध्ये महिला मेळावा आणि तोही भाजपने घेणे हे अतिशय आव्हानात्मक होते. रहाटकर यांनी उपस्थित काश्मिरी महिलांना भारतमातेच्या जयजयकाराच्या घोषणा देण्याचे आवाहन केले आणि पाहता पाहता त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. रहाटकरांच्या या अचानक कृतीने मेळाव्याच्या बंदोबस्तासाठी आलेला जवान आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा क्षणभरासाठी चांगलाच गांगरला; पण कोणताही अनुचित प्रकार न घडता मेळाव्याची सांगता झाली. सुमारे अडीचशे महिला उपस्थित होत्या. मोदी सरकारच्या योजना आणि अटलबिहारी वाजपेयींची ‘काश्मिरीयत’ची संकल्पना यावर रहाटकर यांचे भाषण केंद्रित होते.

अनंतनाग, शोपियाँ, पुलवामा आणि कुलगम या दक्षिण काश्मीरमधील चार जिल्ह्य़ांमध्ये दहशतवादी कारवायांचा उच्छाद आहे. त्यापैकी अनंतनागमधील परिस्थिती सध्या इतकी तणावाची आहे, की तेथील लोकसभेची पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाला बेमुदत काळासाठी लांबणीवर टाकावी लागलेली आहे. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री झाल्यानंतर मेहबूबा मुफ्तींनी लोकसभेचा राजीनामा दिल्याने अनंतनागमध्ये पोटनिवडणूक अपेक्षित आहे. पण दहशतवादी बुरहाण वाणीचा खात्मा केल्यानंतर हिंसाचाराचा डोंब उसळल्याने पोटनिवडणूक लांबणीवर टाकावी लागली. मेहबूबांचे बंधू मुफ्ती तसादक हुसैन यांच्याविरुद्ध काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी.ए.मीर उभे आहेत.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षादेखील असलेल्या रहाटकर एकीकडे अनंतनागमध्ये मेळावा घेत असताना दुसरीकडे भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनीही श्रीनगरमध्ये नुकताच युवकांचा जंगी मेळावा घेतला. काही हजार युवक त्यामध्ये सहभागी झाले होते.जम्मू काश्मीरच्या २०१४मधील निवडणुकीत भाजपने २५ जागा मिळविल्या असल्या, तरी मुस्लीमबहुल काश्मीर खोऱ्यातून पक्षाला खातेही खोलता आलेले नाही. हिंदूबहुल जम्मू विभागात भाजपला ४८ टक्के मते मिळाली होती, पण काश्मीरमध्ये फक्त २.२ टक्के मतांवर समाधान मानावे लागले होते.