तीन दिवसांपूर्वी एका जनसभेला संबोधित करण्यापूर्वी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचा फाटलेला कुर्ता उपस्थितांना दाखवला होता. आपला फाटलेला कुर्ता दाखवत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्यामुळे आता भाजपच्या कर्नाटकमधील युवा मोर्चाने राहुल गांधींना नवीन कुर्ता भेट म्हणून पाठवला आहे.

‘राहुल गांधी यांनी ४० दिवसांपूर्वी बँकेतून ४००० रुपये काढले होते. मात्र यानंतर ते पुन्हा बँकेत फिरकले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे नवा कुर्ता विकत घेण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळेच आम्ही त्यांना युवा मोर्चाच्यावतीने त्यांना नवा कुर्ता पाठवत आहोत. लोक त्यांना येत्या काही दिवसातच धडा शिकतवतील,’ असे भाजप युवा मोर्चाचे नेते श्रीनिवास यांनी म्हटले आहे.

तीन दिवसांपूर्वी राहुल गांधी पक्षाच्या बैठकीसाठी उत्तराखंडला गेले होते. त्यावेळी त्यांनी खिशात हात घातला. मात्र त्यांचा कुर्ता फाटलेला होता. यावरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर शरसंधान साधले होते. ‘माझ्या कुर्ताचा खिसा फाटला आहे. मात्र तुम्ही मोदींजींना अशा फाटक्या कपड्यांमध्ये केव्हाच पाहिले नसेल आणि तरीही मोदीजी नेहमीच गरिबांचे प्रतिनिधीत्व करत असल्याचे सांगतात,’ असे म्हणत राहुल गांधी यांनी त्यांचा फाटका खिसा उपस्थितांना दाखवला होता.

यानंतर अनेकांनी ट्विटरवर राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. राहुल गांधी आत्ताच परदेशातून परतलेत आहेत, हे सगळ्यांच्या अद्याप लक्षात आहे, अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर करण्यात आल्या आहेत. मात्र राहुल गांधी यांनी त्यांचा फाटका कुर्ता दाखवल्यामुळे त्यांना नवा कुर्ता मिळाला आहे.