गोमांस खाल्ल्याच्या तक्रारीवरून भाजप कार्यकर्त्यांनी सरकारी इमारतीत गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना कर्नाटकातील म्हैसूर येथे घडली आहे. म्हैसूर कला मंदिरमध्ये ‘भोजनाच्या सवयी’ यावर चार्विका संस्थेमार्फत तीन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाच्या अखेरच्या दिवशी म्हैसूर विद्यापीठाचे माजी प्राध्यापक आणि डाव्या विचारसरणीचे के. एस. भगवान हेही उपस्थित होते. परिसंवादाच्या अखेरच्या दिवशी भगवान व इतर काहींनी तिथे मटन खाल्ले होते. याची माहिती मिळाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन तिथे मटन नव्हे तर गोमांस खाण्यात आल्याचा आरोप केला व कला मंदिराचे शुद्धीकरण करण्यासाठी गोमूत्र शिंपडले.

म्हैसूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी परिसंवाद आयोजित करणाऱ्या संस्थेला आणि व्यवस्थापकांना नोटीस पाठवली आहे. सरकारी इमारतीत परिसंवादाशिवाय भोजनास परवानगी नव्हती, असे या नोटिशीत म्हटले आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थेने जमा केलेली ५ हजार रूपयांची अनामत रक्कम ही जप्त केली आहे.

म्हैसूरचे उपायुक्त रणदीप डी यांनी ‘न्यूज १८’ ला सांगितले की, जिल्हा प्रशासनाने परिसंवाद आयोजित करणाऱ्या संस्थेला गोमांस किंवा मटन खाल्ल्याच्या तक्रारीवरून नोटीस पाठवण्यात आलेली नाही. त्यांना फक्त सरकारी इमारतीत विना परवानगी भोजन करण्याबाबत खुलासा मागवण्यात आला आहे. कला मंदिरात भोजन केल्यामुळे त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

कला मंदिर हे एक ऐतिहासिक स्थळ आहे. येथे भोजन करण्यासाठी प्रशासनाकडून लेखी परवानगी घ्यावी लागते. उपायुक्तांच्या मते, संस्थेने फक्त परिसंवादासाठी परवानगी घेण्यात आली होती. भोजनापूर्वी जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे.