केंद्रीय मंत्रिपद गेल्यानंतरही सरकारी निवासस्थान न सोडणाऱ्या अजितसिंग यांच्या बंगल्याची वीज व पाणी मागील आठवडय़ात प्रशासनाने तोडले होते. त्याविरोधात अजितसिंग यांनी आपले निवासस्थान हे माजी पंतप्रधान चरणसिंग यांचे स्मारक म्हणून जाहीर व्हावे, अशी जनतेची इच्छा असल्याचे सांगत या प्रश्नाला वेगळे वळण द्यायचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुरादनगर येथे उग्र निदर्शने करीत व पोलिसांच्या गाडय़ांवर दगडफेक करीत सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
अजितसिंग यांचे निवासस्थान ‘१२, तुघलक रोड’ येथे आहे. त्यांचे वडील व माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग हे याच बंगल्यात तब्बल ३६ वर्षे राहिले होते. त्यामुळे या ठिकाणी चरणसिंग यांचे स्मारक व्हावे, अशी जनतेची मागणी आहे, असे सांगत सरकारच्या निर्णयाला एकप्रकारे आव्हान द्यायचा प्रयत्न त्यांनी केला. लालबहादूर शास्त्री, कांशीराम आदींची स्मारके अशा प्रकारे उभी राहिली आहेत. मग चौधरी चरणसिंगांचे का नाही, असा सवाल त्यांनी केला.