निश्चलनीकरणानंतर मोठय़ा प्रमाणावर बेहिशेबी धनजप्ती केली जात असून शनिवारी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्य़ातील एका हवाला दलालाच्या घरातील स्नानगृहात लाद्यांमागे दडवून ठेवलेली नव्या नोटांच्या स्वरूपातील ५.७ कोटी रुपयांची आणि ९० लाख रुपये जुन्या नोटांच्या स्वरूपातील रोख रक्कम जप्त केली. त्याचप्रमाणे ३२ किलो सोनेही जप्त करण्यात आले आहे.

चेन्नईतून आतापर्यंत सर्वात मोठी म्हणजे २४ कोटी रुपयांची नव्या नोटांच्या स्वरूपातील रोख रक्कम जप्त केली आहे. चेन्नईमध्ये १४२ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आणि सोने जप्त करण्यात आले आहे.

हैदराबादच्या टपाल कार्यालयातील ज्येष्ठ निरीक्षकांकडून सीबीआयने दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांच्या स्वरूपातील ६५ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. जवळपास ३.७५ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देण्यासाठी के. सुधीर बाबू यांनी ६५ लाख रुपये दलाली घेतली, असे सीबीआयने सांगितले.

निश्चलनीकरणानंतर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळ्या पैशांविरुद्ध मोहीम हाती घेतली असून त्या दरम्यान हवाला दलालाच्या घरातील स्नानगृहात लादीमागे दडविलेली रोकड जप्त केली आहे. या हवाला दलालाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी हवाला दलालाच्या घरावर छापा टाकला तेव्हा स्नानगृहात बेसिनच्या मागील लाद्यांमध्ये दडवून ठेवलेली रोकड मिळाली.

रामपुरा परिसरात चार जणांना बनावट चलनासह अटक

येथील रामपुरा परिसरातून चार जणांना बनावट चलनासह अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन हजार आणि १०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात ४.१५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या खबरीवरून त्यांनी रामपुरातील टी-पॉइण्ट येथे एक गाडी थांबविली आणि या बनावट नोटा जप्त केल्या. नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रे आणि अन्य साहित्यही त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहे. हा चार जण बनावट नोटा छापून त्यांचा पुरवठा करीत असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले आहे.

आंध्र प्रदेशमधील कोथूरमधून ८२ लाख जप्त

येथून नजीकच असलेल्या कोथूरमधून दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांच्या स्वरूपातील ७१ लाख रुपयांच्या रकमेसह एकूण ८२ लाख रुपयांचे चलन जप्त करण्यात आले आहे. १०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात ११ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली, कोथूर येथे गाडय़ांची तपासणी करण्यात येत असताना ही रोकड जप्त करण्यात आली. नोटांच्या बदल्यात दलाली घेणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.