काळा पैसा बाळगणारे ‘मोठे’ आहेत की ‘छोटे’ आहेत याचा विचार न करता त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही काळा पैशाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष तपास पथकाचे प्रमुख न्या. शहा यांनी दिली आहे.
आमच्या समोर कोणीही मोठा अथवा छोटा नाही. आम्हाला सगळेच सारखे आहेत. देशाला ज्या ज्या कुणी लुटले असले त्या सगळ्यांना पकडून शिक्षा केली जाईल, एवढे आम्ही नक्की सांगू शकतो. आम्ही दोघेही यासाठीच विशेषत्वाने ओळखले जातो, असे या तपास पथकाचे उपप्रमुख माजी न्यायाधीश न्या. अरिजित पसायत यांनी न्या. शहा यांचा उल्लेख करीत सांगितले. जिनेव्हामधील एचएसबीसी बँकेतील ६०० हून अधिक खातेधारकांची नावे आमच्याकडे आली असली तरी आम्ही आणखीनही नावे गोळा करीत आहोत. काळा पैसा साठवणारा लहान आहे की मोठा आहे याची पर्वा आम्ही करणार नाही. देशातील सगळ्यात गरीब नागरिकाप्रमाणेच यांच्याशीही आमची वागणूक सारखीच असेल, अशी ग्वाही शहा यांनी दिली.
गोपनीयता करारांचा भंग नाही
सर्वोच्च न्यायालयाच्या दट्टय़ामुळे सरकारने ६२७ जणांची नावे न्यायालयात सादर केली खरी. परंतु या प्रकारामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अन्य देशांशी झालेल्या गोपनीयता करारांचा भंग होऊ शकतो, असे मत मांडले जात आहे. त्यासंदर्भात अशा आंतरराष्ट्रीय गोपनीयता करारांचा भंग आम्ही करणार नाही, असे स्पष्टीकरणही न्या. शहा यांनी दिले.