मोबाईल उत्पादनातील प्रसिद्ध ‘ब्लॅकबेरी’ कंपनीने आपल्या ‘ब्लॅकबेरी झेड-१०’ मोबाईल मॉडेलची विक्री वाढविण्याच्या उद्देशाने आपल्या मोबाईल ग्राहकांसाठी नवी एक्सचेंज योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत ब्लॅकबेरी मोबाईल धारकांना आपला जुना ब्लॅकबेरी मोबाईल कंपनीला परत देऊन ब्लॅकबेरीच्या मोबाईल मॉडेल्समधील सर्वाच हायग्रेड ‘ब्लॅकबेरी झेड १०’ या मोबाईलच्या खरेदीवर अकरा हजार रुपयांची सवलत मिळणार आहे.
भारतातील एकूण सतरा शहरांमधील ब्लॅकबेरी मोबाईल विक्री केंद्रावर ही सवलत उपलब्ध करून देण्यात आली असून त्यानुसार ब्लॅकबेरीचा जुना मोबाईल परत केल्यास ‘ब्लॅकबेरी झेड १०’ मोबाईल खरेदीवर अकरा हजार रुपयांची सुट मिळणार आहे. असे ब्लॅकबेरी इंडिया कंपनीच्या विक्रीविभागाचे संचालक प्रसेनजीत सेन यांनी सांगितले.
‘ब्लॅकबेरी झे़ड १०’ मोबाईल संपुर्णपणे टचस्क्रीन असून तो भारतात सध्या ब्लॅकबेरीच्या संकेतस्थळावरून विकत घेता येत आहे. या मोबाईलला १.५ मेगाहट्सचा ड्युएल कोअर प्रोसेसर असून ८ मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा व २ मेगापिक्सेलचा व्दीतीय कॅमेरा देण्यात आला आहे. या नव्या सवलतीनुसार मूळ ४२,४९० किंमतीचा ब्लॅकबेरी झे़ड-१० मोबाईल ३७,५०० रुपयांना ब्लॅकबेरी ग्राहकांना विकत घेता येणार आहे.