ओदिशातील गंजम जिल्ह्यात अतिशय संकटग्रस्तांच्या यादीतील काळविटांच्या संख्येत गेल्या चार वर्षांत एक हजार ६१२ इतकी वाढ झाली आहे. स्थानिक भाषेत काळवीटला कृष्ण सारा मृग किंवा बळी हरीण, असे म्हणतात. २०११ मध्ये ही संख्या २ हजार १९४ होती, तर २०१५ मध्ये ती ३ हजार ८०६ इतकी झाली आहे, असे ओदिशाचे मुख्य वन्यजीव रक्षक एस.एस. श्रीवास्तव यांनी सांगितले.
ओदिशा वनखात्याच्यावतीने आस्का, बुगुडा, पोलासारा, खल्लीकोट, जगन्नाथ प्रसाद आणि बरहमपूर या वनक्षेत्रात काळवीट प्रगणना करण्यात आली. या पाच ते सहा तास चाललेल्या प्रगणनेत सुमारे ३०० वन्यजीवप्रेमी आणि तज्ज्ञांनी सहभाग घेतला, असे वनखात्याच्या सूत्रांनी सांगितले. या संपूर्ण काळविटांच्या संख्येत २ हजार ८६ मादी, १ हजार १६६ नर व ५५४ तरुण काळविटांचा समावेश असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले. गंजम जिल्ह्यात काळविटांची संख्या वाढल्यामुळे ते जगन्नाथ प्रसाद, बेलगुंठा, रंभा या वनक्षेत्रात स्थलांतरित झाले आहेत. जगन्नाथ प्रसाद या वनक्षेत्रात प्रथमच काळवीट प्रगणना करण्यात आली आणि आश्चर्य म्हणजे, त्या ठिकाणी १६८ प्राणी आढळले. या जिल्ह्याला १२ ऑक्टोबर २०१३ ला फैलीन चक्रीवादळाचा फटका बसल्याने काळविटांनी इतरत्र स्थलांतर केले होते. काळविटांची संख्या वाढण्यामागे वनखात्याच्या कर्मचाऱ्यांचा जेवढा सहभाग आहे तेवढाच सहभाग स्थानिक नागरिकांचाही आहे. त्यांनी काळविटांचे अधिवास क्षेत्र संरक्षित केल्यामुळे काळविटांच्या संख्येत वाढ झाल्याचे श्रीवास्तव म्हणाले. या क्षेत्रात १९७३ साली ५२३ काळवीट होते. १९९८ मध्ये ते वाढून ५५१, २००४ साली ७८६, २००६ साली १ हजार १०१ इतकी झाले.
वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकच्या संख्येत काळवीट बळीपडरा-भेटनाई क्षेत्रात दिसत आहेत. या परिसरात सुमारे ७० गावे आहेत. बुगडा वनक्षेत्रात १ हजार २३९, आस्का येथे १ हजार २३, खल्लीकोट येथे १ हजार १९, पोलासारा येथे ३५६, जगन्नाथ प्रसाद येथे १६८ आणि बरहमपूर येथे १ काळवीट आहेत. बळीपडरा-भेटनाई क्षेत्रात स्थानिक लोकांच्या अनेक पिढय़ांपासून काळविटांचे संरक्षण केले जात आहे. धानाच्या शेतात काळवीट दिसून आल्याने त्याच्या संरक्षणाचे काय, असा प्रश्न उपस्थित झाल्याचे काळवीट संरक्षण समितीचे अध्यक्ष अमूल्य उपाध्याय म्हणाले. गावकरी कधीच प्राणी मारत नाहीत. त्यांच्या शेतात ते चरायला गेले तरीसुद्धा ते प्राण्यांना हात लावत नाही, असे ते म्हणाले. स्थानिक लोकांच्या संरक्षणामुळे या क्षेत्रात काळविटांची शिकार होत नाही, असे घुमुसारा दक्षीण वनखात्याचे विभागीय वनाधिकारी आर.के. मल्लिक म्हणाले.