सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेच्या कुबडय़ा घेण्याची तयारी असली तरी मुख्यमंत्रिपद व अन्य महत्त्वाची खाती भाजपकडेच ठेवण्याची अट पुढे केली जाईल, असे दिल्लीस्थित भाजप नेत्याने स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या अटी मान्य करून सत्ता स्थापन केल्यास वारंवार संघर्षांचा ‘सामना’ होण्याची भीती भाजप नेत्यांना आहे. त्यामुळे सेनेची मदत घ्यावी लागली तरी त्यांचे ‘ब्लॅकमेलिंग’ सहन करणार नाही, असे भाजपच्या बडय़ा नेत्याने स्पष्ट केले.    
राज्यात सत्तास्थापनेसाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यात येथे सुमारे तासभर चर्चा झाली. नितीन गडकरी स्वत राज्यात परतण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे पारडे जड मानले जात आहे. परंतु बहुजन चेहरा व व ज्येष्ठतेचा निकष लावल्यास एकनाथ खडसे यांचीही वर्णी लागू शकते. परंतु गेल्या वर्षभरापासून खडसे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या नावावर केंद्रीय नेतृत्वाचे शिक्कामोर्तब होण्याची शक्यता कमीच असल्याचा दावा पक्षसूत्रांनी केला. दरम्यान, भाजपचा विधिमंडळ नेता ठरवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह व सरचिटणीस जे.पी. नड्डा सोमवारी रात्री मुंबईत दाखल झाले.