स्वयंघोषित संत आसाराम बापू यांनी जे काही सांगितले, ते ‘ब्रह्म वाक्य’ समजून त्याचे पालन करीत गेलो आणि तीच आमची चूक झाली, अशी भावना शारीरिक शोषण झालेल्या पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केली. दिल्लीतील या पीडितेच्या शारीरिक शोषणावरून शनिवारी रात्री आसाराम बापू यांना जोधपूर पोलिसांनी इंदूरमधून अटक केली. न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 
समर्थकांचा थयथयाट! 
आसाराम बापूंनी जे काही सांगितले त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही त्यांचे ऐकत गेलो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे शहाजहांपूरमधील जमीन आम्ही आश्रम बांधण्यासाठी दान केली आणि त्याच्या बांधकामावर स्वतः लक्ष दिले. पाच वर्षांपूर्वी मी माझ्या मुलीला आसाराम बापूंच्या गुरुकुलमध्ये घातले. केवळ त्यांच्यावरील विश्वासामुळे मध्य प्रदेशमधील छिंदवाडा येथे असलेल्या गुरुकुलमध्ये मुलीला ठेवण्यास आम्ही तयार झालो. मात्र, १५ ऑगस्ट रोजी मुलीचे शारीरिक शोषण झाल्याचे कळल्यावर मोठा धक्काच बसला, असे पीडितेच्या वडिलांनी सांगितले. गेल्या अकरा वर्षांपासून आसाराम बापू यांच्यावर असलेला विश्वासच एकदम उडाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या पीडितेच्या घरी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तिच्या वडिलांनी स्वतःच्या घराबाहेर आसाराम बापूंच्या आश्रमाकडे जाण्याचा मार्ग दर्शविणारा फलक लावला होता. या घटनेनंतर तो फलक काढून फेकून देण्यात आलाय.