खिमा, पापड यासारख्या शब्दांनी ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशात स्थान मिळविल्याची बातमी गेल्या आठवड्यात सर्वत्र गाजली. विलायतेतील कौतुकासाठी आसावलेल्या भारतीयांना यामुळे नव्याने आनंदाचे भरते आले. काही जणांच्या अंगावर उगाचच मूठभर मांस चढले. परंतु हा मान इंग्रजीत नव्हे तर ग्लोबिशमध्ये मिळाल्याचे वास्तव नजरेआड झाले ते झालेच.
गेल्या सोमवारी ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशाची नववी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. शब्दकोशाच्या नव्या आवृत्तीत सुमारे २५० भारतीय भाषांमधील इंग्रजी शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात खिमा, पापड, करी लीव्ह (कडीपत्ता) यांसारख्या शब्दांनी शब्दकोशात जागा मिळवली आहे.
“इंग्रजी ही वैश्विक भाषा आहे आणि जगभरातील भाषेचा तिच्यावर प्रभाव आहे. भारतीय पदार्थ हे जगभरात लोकप्रिय आहेत. जगभरातील या शब्दांच्या वापराचे प्रतिबिंब म्हणून या नव्या शब्दांचा शब्दकोशात समावेश करण्यात आला आहे,” असे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या शब्दकोश व संदर्भ कोशाचे प्रमुख पॅट्रिक व्हाईट यांनी म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. भारतीय इंग्रजीतील त्यामुळे ६० टक्क्यांहून अधिक शब्द हिंदी भाषेतून येतात. गेल्या काही वर्षांत भारतीय भाषांमधून ऑक्सफर्ड शब्दकोशात सुमारे ९०० ते १००० इंग्रजी शब्द समाविष्ट झाले आहेत.
ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोश हा इंग्रजीच्या मुख्य संदर्भ साहित्यापैकी मानता येतो. त्यामुळे त्यात एखाद्या शब्दाचा प्रवेश हा ’ऑथेंटिक’ इंग्रजीतील प्रवेश मानण्यात येतो. परंतु खुद्द ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोश हा ग्लोबिश या निराकार, निर्गुण भाषेच्या प्रभावाखाली येत आहे. त्यामुळे पापड हा इंग्रजीचा नव्हे तर ग्लोबिशचा भाग बनला आहे, असे म्हणायला पाहिजे.
ग्लोबिश हा शब्द – खुद्द इंग्रजी भाषेप्रमाणेच – फ्रेंचांची देणगी आहे. फ्रान्समधील डॉ. ज्याँ पॉल नेरिये यांनी हा शब्द घडवला. केवळ १५०० शब्दांची ही भाषा ऑक्सफर्ड इंग्रजीचा दरारा संपवेल, अशी ’टाइम’ व ‘इंटरनॅशनल हेरॉल्ड ट्रिब्यून’सारख्या वृत्तपत्रांची भविष्यवाणी आहे. आईबीएममध्ये काम करणाऱ्या नेरिए यांनी केवळ या भाषेची व्याख्याच केली नाही तर तिचा प्रसारही केली. त्यासाठी Don’t Speak English, Parlez Globish आणि Decouvrez Le Globish नावाची दोन पुस्तकेही लिहिली आहेत.
नेरिए यांच्या मते, “एक दिवस येईल, जेव्हा इंग्रजी भाषक जाणतील, की त्यांचे प्रमाण केवळ १२ टक्के आहे. त्यांना जाणवेल, की भविष्यातील मुख्य बाजार केवळ इंग्रजी जाणणाऱ्यांचा नसेल. जगाशी त्यांना संपर्क साधायचा असेल किंवा येथे व्यापार करायचा असेल, तर त्यांना आपली इंग्रजी त्या त्या परिस्थितीनुसार जुळवून घ्यावी लागेल. हे काम ग्लोबिशच करू शकते. त्यावेळी जगात इंग्रजी काही जुन्या संस्कृती, मानाची किंवा वारसा भाषेच्या स्वरूपात जिवंत राहील.”
खुद्द ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशाच्या संकेतस्थळावर नामवंत लेखक रॉबर्ट मॅकक्रम (यांनी २००९ साली ग्लोबिश – हाऊ दि इंग्लिश लँग्वेज बिकेम वर्ल्डस लँग्वेज) यांचा लेख आहे – दि राईज ऑफ ग्लोबल इंग्लिश -त्यात ते म्हणतात, “….आंग्ल-अमेरिकी मुळापासून खरोखर स्वातंत्र्य प्रकट करू शकणारी, जागतिक संवादाची घटना म्हणून इंग्रजी भाषा ही एकाच वेळेस रोमांचक आणि निर्णायक घटना आहे. या घडामोडीचे भवितव्य केवळ एखादा मूर्खच सांगू शकतो…”
मॅकक्रम यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ‘रॉयटर्स’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, “पूर्वी १९व्या शतकात ब्रिटीश इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा होती. २०व्या शतकात अमेरीकी इंग्रजी मुख्य भाषा बनली. आता २१व्या शतकात तिसरा टप्पा आला आहे – ग्लोबिश शतकाचा.”
चीन किंवा भारतात व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी ग्लोबिश शिकून घ्यावी, नसता इंग्रजी मातृभाषा असलेल्यांनाही व्यापार करणे कठीण जाईल, असा सल्लाही त्यांनी दिला होता.
या भाषेच्या प्रसार एवढा, की २००९ साली बराक ओबामा यांनी पहिल्यांदा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा त्यांनी केलेल्या पहिला भाषणाचा ग्लोबिशमध्ये अनुवाद करण्यात आला होता. आज जपानी शाळांमध्ये इंग्रजी शिकण्यासाठी त्या भाषणाचा वापर केला जातो.
अशा तऱ्हेने इंग्रजीने अनेक प्रवाह आपल्यात सामावले आहेत. तेव्हा ऑक्सफर्ड शब्दकोशात नवीन शब्द येतात तेव्हा ते डॉ. जॉन्सन यांच्या मेहनतीमुळे नव्हे, तर जगभरातील शब्दांचे ओघ घेऊन येतात. वर व्हाईट म्हणतात तसे, दुनियाभराचे प्रतिबिंब त्यात पडत आहे.
तेव्हा आपले पापड असो का खीमा, हे राणीच्या इंग्रजीत नव्हे तर जनतेच्या इंग्रजीत समाविष्ट झाले आहेत. इतके लक्षात घेतले तरी पुरे!
– देविदास देशपांडे
devidas@didichyaduniyet.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)