‘इयं आकाशवाणी, संप्रति वार्ताः श्रुयंताम्। प्रवाचकः ・’ या वाक्यांनी सुरू होणाऱ्या संस्कृत बातम्या आकाशवाणी ऐकलेल्या जुन्या श्रोत्यांच्या लक्षात आजही असतील. मुख्यतः दिल्ली केंद्रावरून तसेच आकाशवाणीच्या अनेक केंद्रांवरून ही पाच पाच मिनिटांची वार्तापत्रे प्रसारित करण्यात येत असतात. आजही! अर्थात आज त्यांचे श्रोते किती असतील, हा प्रश्नच आहे. मात्र या बातम्यांच्या इतिहासात एक नवीन इतिहास नुकताच लिहिण्यात आला तो केरळमध्ये. मल्याळी चित्रपटांच्या एका सुपरस्टारने एका खासगी दूरचित्रवाणीच्या उद्घाटन समारंभात संस्कृतमध्ये बातम्या सादर करून उपस्थितांना अचंबित केले. आंतरजालावर या घटनेची दृश्यफीत सध्या धुमाकूळ घालत आहे, यात नवल ते कसले?
मोहनलाल हा मल्याळी चित्रपटांचा सुपरस्टार. गेली तीस वर्षांहून अधिक काळ लोकप्रिय तसेच कलात्मक अशा दोन्ही चित्रपटांतून त्याने आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडली आहे. तब्बल चार वेळेस राष्ट्रीय पारितोषिक मिळविण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. भारतातील सर्वात सहज अभिनय करणारा अभिनेता असे त्याचे सार्थ वर्णन केले जाते. अशा या अभिनेत्याने हे आगळेवेगळे पाऊल उचलले आहे. बातम्या सादर करून स्टार अॅंकर म्हणून मिरविण्याचा काळ आता आला आहे पण संस्कृत बातम्या वर्षानुवर्षे वाचूनही कोणाला प्रसिद्धी मिळाली नाही. तेव्हा एका नटाने या क्षेत्रात पाऊल टाकून ही कसर भरून काढली, असे म्हणावे लागेल.
‘जनम’ नावाची एक नवी वाहिनी नुकतीच केरळमध्ये सुरू झाली आहे. या वाहिनीच्या उद्घाटन कार्यक्रमात मोहनलाल याने ‘संप्रति वार्ताः श्रुयंताम्। प्रवाचकः मोहनलालः’ अशी साद घालून वाहवा मिळविली. यातील आणखी एक विशेष म्हणजे त्याआधी मोहनलालची ओळख करून दिली मल्याळममधील दुसरा सुपरस्टार आणि जन्माने मुस्लिम असलेल्या मम्मुटी याने. ‘बातम्या वाचणारी व्यक्ती तुम्हाला आता एक आश्चर्याचा धक्का देणार आहे. सम्प्रति वार्ताः’ अशी सुरुवातच मम्मुटी याने केली.
आता यात एवढे कौतुक करण्यासारखे काय आहे, असे कोणी विचारेलही. परंतु संस्कृतला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी असे प्रयत्न होण्याची गरज आहे. संस्कृतमध्येच याला अरुंधतीन्याय असे नाव आहे. अरुंधती नावाचा मोठा तारा दाखवून त्याच्या सभोवतीचे छोटे तारे पाहायला शिकवतात, त्याला ही संज्ञा आहे. कोणत्या तरी मोठ्या व प्रसिद्ध वस्तू किंवा व्यक्तीच्या साहाय्याने अप्रसिद्ध वस्तूची ओळख पटविणे, असा त्याचा अर्थ. आज मोहनलाल आणि मम्मुटी सारख्यांना नाव आहे आणि त्यांच्या मागे धावणारा, त्यांचे अनुकरण करणारा लोकसमूह सुद्धा आहे. संस्कृतला मात्र आज वाईट दिवस आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी संस्कृतसाठी काही करण्याचे ठरविेले, तर अल्पांशाने का होईना लोक इकडे आकृष्ट होतीलच. आजही संस्कृतमधून मासिके, साप्ताहिके एवढेच काय दैनिकेही प्रकाशित होत आहेत. मात्र त्यांची व्याप्ती कमी पडते. तेव्हा अशा सुपरस्टार्सनी एक पाऊल पुढे टाकून एका ऐतिहासिक आणि सुंदर भाषेला हात द्यायचे ठरविले, तर ते हवेच आहे. (संस्कृतचे जतन होण्यासाठी तिला सर्व भाषांची जननी वगैरे म्हणण्याचे कारण नाही. ती जननी असो अथवा अपत्य असो, प्रश्न त्या भाषेतील ज्ञानाचा साठा आणि अभिव्यक्तीची क्षमता यांचा आहे. त्यासाठी ती टिकायलाच हवी आहे.)
काही दिवसांपूर्वी आपल्या महाराष्ट्रात संस्कृत नाटकांची स्पर्धा झाली होती. त्याला भरघोस असा प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळीही या भाषेतून आधुनिक विचार व भावना प्रकट करण्याची क्षमता कायम असल्याचे दिसून आले होते. तसेच ती मृत भाषा नसल्याचेही स्पष्ट झाले होते. तसे ते वारंवार होत असते.
मोहनलालच्या बाबतीत बोलायचे झाले तर याआधी भासाच्या ‘कर्णभारम्’ या नाटकामध्ये काम केलेले आहे. आज जेव्हा किरकोळ नट सुद्धा आपला डामडौल दाखविण्यासाठी इंग्रजीच्या फैरी झाडत असतो आणि मातृभाषेत बोलण्याची त्याला लाज वाटते, तेव्हा एवढ्या मोठ्या कलाकाराने आपल्या मुळांची जाणीव ठेवावी, याला दाद द्यावीच लागेल.
हे सांगण्याचे कारण म्हणजे आधुनिक बातम्या, आधुनिक ज्ञानही संस्कृतमध्ये येऊ शकते, हे आकाशवाणीच्या बातम्यांमुळेच कळू शकते. परंतु संस्कृतमधील बातम्या सुरू करण्याचे श्रेय आकाशवाणीला नाही तर ते डॉईशे वेले या जर्मन नभोवाणी संस्थेला जाते. तिनेच ३ फेब्रुवारी १९६६ रोजी या केंद्रावरून संस्कृत कार्यक्रमांचे प्रसारण सुरू केले. त्यानंतर भारताच्या संसदेत या विषयावर चर्चा झाली आणि मग आकाशवाणीवर संस्कृत बातम्या सुरू झाल्या. त्यानंतर यशावकाश त्या दूरदर्शनवर आणि आकाशवाणीच्या संकेतस्थळावर ध्वनी व लेख स्वरूपात आहेत. मात्र या काळात डॉईशे वेलेवरील संस्कृत बातम्या कधीच अंतर्धान पावल्या. जर्मन सरकारने केलेली अर्थकपात आणि श्रोत्यांचा कमी होणारा प्रतिसाद, हे त्या मागील कारण सांगितले गेले.
येथून पुढे तरी असे होऊ नये, म्हणून हे बातम्यापुराण!
– देविदास देशपांडे
devidas@didichyaduniyet.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान