‘ब्लू व्हेल गेम’च्या आहारी जाऊन एका १७ वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हरयाणातील पंचकुला भागात ही घटना घडली. करण ठाकूर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. करण हा डीएव्ही स्कूलचा विद्यार्थी होता. करणने त्याच्या मोबाईलवर ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ हा गेम डाऊनलोड केला. त्याच्या आत्महत्येबाबत पोलिसांना त्याच्या आई-वडिलांनीच कळवले. करण मोबाईलच्या आहारी गेला, त्याचमुळे आम्ही त्याला येत्या काही दिवसात मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जायचे ठरवले. याबाबत मी करणच्या वडिलांशी चर्चाही केली होती, अशी माहिती त्याच्या आईने दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

करणच्या मोबाईलमध्ये ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ हा गेम डाऊनलोड केल्याचे आम्हाला शनिवारी समजले. तसेच त्याच्या वहीतही काही चित्रे काढलेली आहेत ज्यावरून तो या गेमच्या आहारी गेल्याचे आम्हाला समजले. आयुष्य जगण्याची माझी योग्यता नाही, मला मेलेच पाहिजे (”I should just die and I don’t deserve to live”.) असे वाक्यही त्याच्या वहीत त्याने लिहिले असल्याचे करणच्या आई वडिलांनी म्हटले आहे. याप्रकरणी आता पोलीस अधिक माहिती घेत आहेत.

करणने त्याच्या वहीत काढलेली चित्रे आणि लिहिलेला मजकूर

 

आठवड्याभरापूर्वीच ‘ब्लू व्हेल’ या गेम संदर्भात सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या गेमच्या बंदीबाबत केंद्राची भूमिका काय आहे, ते स्पष्ट करावे असे न्यायालयाने म्हटले आहे. सरकारने यावर अद्याप उत्तर दिलेले नाही. तसेच देशभरात जुलै महिन्यापासून अनेक मुलांनी या गेमच्या आहारी जाऊन आमहत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.

नेमका आहे तरी काय आहे हा ब्लू व्हेल गेम?
ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या या गेममध्ये प्रत्येक प्लेयरला एक मास्टर मिळतो.
अँड्रॉईडवरून हा गेम एकदा डाऊनलोड केला की डिलिट करता येत नाही.
रक्तानं ब्लू व्हेल कोरणे, भीतीदायक सिनेमा पाहणं असे टास्क दिले जातात.
गेमचा मास्टर ५० दिवस प्लेयरवर नियंत्रण ठेवतो आणि सगळे टास्क पूर्ण करायला भाग पाडतो.
हा गेम एकूण ५० लेव्हल्सचा आहे, यातील ५० वी लेव्हल आत्महत्या करणे आहे.