पाकिस्तानने भारताच्या स्वाधीन केलेल्या ५७ मच्छिमारी नौका मंगळवारी गुजरातच्या पोरबंदर येथे दाखल झाल्या. या सर्व नौकांवर भाजपचे झेंडे आणि नरेंद्र मोदींचे अभिनंदन करणारे फलक लागलेले होते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी या नौका परत आणण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी हे फलक बोटींवर लावण्यात आल्याचे या नौकांच्या मालकांचे म्हणणे आहे.
बंदरात उभ्या असलेल्या या नौकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आणि गुजरातचे मत्यव्यवसाय मंत्री बाबुभाई बोकारिया यांचे आभार मानणारे प्रत्येकी तीन फलक लागले होते. याशिवाय, या नौका त्यांच्या मालकांकडे सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमातही भाजपचे फलक घेतलेल्या मच्छिमारांची गर्दी होती.
मी कोणत्याही राजकीय पक्षाचा समर्थक नाही. काहीजणांकडून मला भाजपचे फलक आणि झेंडे देण्यात आल्यानंतर मी ते नौकेवर लावले. आमच्या नौका परत आणण्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी खरोखरीच मेहनत घेतली आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानणे आमचे कर्तव्य असल्याची प्रतिक्रिया येथील मच्छिमारी नौकेचे मालक दिनेश भद्रेचा यांनी दिली. अन्य काही मच्छिमारांनीही यावेळी मोदींचे आभार मानताना, आम्हाला भाजपचे झेंडे आणि फलक झळकवण्यात काहीही वावगे वाटत नसल्याचे सांगितले. यूपीए सरकारच्या कार्यकाळात वारंवार विनंती करूनही पाकिस्तानने एकही मच्छिमारी नौका परत केली नव्हती. पाकिस्तानने जप्त केलेल्या आमच्या नौका परत मिळतील, ही आशाही आम्ही सोडून दिली होती, असे जितू लोधानी यांनी सांगितले. गेल्यावर्षीच्या मे महिन्यात नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी नवाज शरीफ उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांनी भारताच्या ५७ मच्छिमारी नौका परतवण्याचे आश्वासन दिले होते.