१२ जण ठार, अनेक जखमी

काबूलच्या सीमेवर विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या अमेरिकी विद्यापीठावर झालेल्या आणि अनेक तास चाललेल्या भीषण धुमश्चक्रीत १२ लोक ठार आणि अनेकजण जखमी झाल्यानंतर रविवारी सकाळी हा हल्ला संपुष्टात आला.

अफगाणिस्तानातील सुरक्षा दलांनी सुरक्षा व्यवस्थेत सुधारणेचे प्रयत्न केल्यानंतरही तेथील दहशतवादी देशाच्या राजधानीसह कुठेही मोठय़ा प्रमाणावर हल्ले घडवून आणू शकतात, हे या हल्ल्यावरून अधोरेखित झाले आहे.

हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये सात विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते सेदिक सिद्दिकी यांनी सांगितले. दोन पोलीस अधिकारी व दोन सुरक्षा कर्मचारीही या हल्ल्यात ठार झाले आहेत. मृतांपैकी बहुतांश जण वर्गखोल्यांच्या खिडक्यांजवळ करण्यात आलेल्या गोळीबारात मारले गेले, असेही सिद्दिकी म्हणाले. अद्याप कुठल्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसली, तरी संशयाची सुई तालिबानवरच आहे. तालिबान ‘शोध घेत आहे’, एवढेच संघटनेचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने माध्यमांना सांगितले. या हल्ल्याची सुरुवात बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास झाली. या प्रतिष्ठित विद्यापीठात हजारो विद्यार्थी ज्या वेळी वर्गात उपस्थित असतात अशीच वेळ निवडून विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ आत्मघातकी कारबाँब हल्ला करण्यात आला. स्फोटामुळे सुरक्षा भिंती कोसळून पडल्या आणि वाहनाच्या चालकासह इतर दोन ‘दहशतवाद्यांना’ या परिसरात शिरणे शक्य झाले. हल्लेखोरांजवळ बाँब तसेच स्वयंचलित शस्त्रे होती. पहाटे साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी दोन हल्लेखोरांना ठार करेपर्यंत त्यांनी विद्यापीठाला जवळजवळ नऊ तास वेढा दिला होता, असेही सिद्दिकी म्हणाले. बहुतांश विद्यार्थ्यांसह विद्यापीठाच्या इमारतीत अडकून पडलेल्या दोनशेहून अधिक लोकांची पोलिसांच्या विशेष पथकांनी सुटका केली. जखमींमध्ये एका विदेशी शिक्षकाचाही समावेश होता असे काबूलचे पोलीस प्रमुख अब्दुल रहमान रहिमी यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी आपण रुग्णालयात जाऊन जखमींची भेट गेतली, तसेच मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले, असे अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी सांगितले. ‘शिक्षणसंस्था व सार्वजनिक स्थळांवरील हल्ला’ असे त्याचे वर्णन करून, यामुळे दहशतवादाची मुळे उखडून फेकण्याचे आमचा इरादा आणखी मजबूत झाला आहे असे ते म्हणाले.