सत्तराव्या कान चित्रपट महोत्सवाला शनिवारी सायंकाळी  बॉम्बच्या अफवेमुळे विलंबाने सुरुवात झाली. जीन ल्युक गोडार्ड व अभिनेत्री अॅनी विझेमस्की यांच्या नात्यावर आधारित चित्रपट दाखवला जाणार होता पण त्याआधीच बॉम्बची अफवा पसरल्याने विलंब झाला. कान हे फ्रान्स नजीकचे रिसॉर्ट शहर आहे. ‘ले चिनॉइज’ या १९६० मधील चित्रपटाच्या निर्मितीवेळी गोडार्ड व अॅनी यांचा विवाह झाला होता.

चित्रपट महोत्सवाच्या आयोजकांनी कुठलीही जोखीम न पत्करता प्रेक्षागृहाची तपासणी झाल्यानंतरच कार्यक्रमास सुरुवात केली. सायंकाळी ‘रिडाउटेबल’ हा चित्रपट दाखवला जाणार होता त्या वेळी प्रचंड गर्दी झाली, त्यामुळे अडथळे लावावे लागले. संशयास्पद बॅग सापडल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ झाला असे सांगण्यात आले, पण ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले. प्रेक्षकांना आत सोडण्यास सुरुवात झाल्यानंतर २० मिनिटांत प्रेक्षागृह भरले. कार्यक्रमाला ४५ मिनिटे विलंब झाला. कान महोत्सव १२ दिवसांचा असून ल्युमिएर व सॅली डेबसी या थिएटरमध्ये चित्रपटांचे प्रदर्शन सुरू झाले आहे. कानपासून ३० कि.मी. अंतरावर असलेल्या नाइस येथे वर्षभरापूर्वी लोन वूल्फ (एकदोन अतिरेक्याकडून केला जाणारा हल्ला) हल्ला बॅस्टिली दिनाच्या वेळी झाला होता. त्यामुळे कान महोत्सवात दक्षता घेतली जात आहे.

सोनम कपूरचा देशी अवतार

भारतीय तारका दीपिका पडुकोण, ऐश्वर्या राय, सोनम कपूर या कान महोत्सवात उपस्थित आहेत. सोनम कपूरने देशी स्वरूपात दर्शन देताना साडी परिधान केली होती. ही ‘युनिकॉर्न’  रंगाची साडी ‘नॉरब्लॅक नॉरव्हाइट’ या कॅनेडियन डिझायनर मृग कापडिया व अमृत कुमार यांच्या आस्थापनाने  तयार केली होती. तिने परिधान केलेले ‘व्हाइट क्रॉप ब्लाउज’ साडीला साजेसे होते. ‘स्पोर्टीस्पाइस’ या हॅशटॅगने तिने इन्स्टाग्रामवर छायाचित्रे टाकली. सोनम ही लोरियल पॅरिस इंडियाची ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

ऐश्वर्याचा स्ट्रॅपलेस गाऊन

ऐश्वर्या राय बच्चनने कान महोत्सवात दुसऱ्यांदा रेड कार्पेट अदाकारी दिली. तिने ‘स्ट्रॅपलेस गाऊन’ परिधान केला होता. ‘रेड राल्फ व रूसो’ यांचे ते डिझाइन आहे, तिची छायाचित्रे टिपण्यास छायाचित्रकारांची झुंबड उडाली. ओठांना तिने गडद रंग लावला  होता. २००२ मध्ये ती पहिल्यांदा देवदासाच्या निमित्ताने  रेड कार्पेटवर आली होती.

दीपिकाने लक्ष वेधले

दीपिका पडुकोणने पहिल्याच कान अदाकारीत सर्वाचे लक्ष वेधले. तिच्या पोशाखाचे व्हॅनिटी फेअर, व्हॉग, व पीपल या नियतकालिकांनी कौतुक केले. ‘प्लम मार्शेशा गाऊन’ व ‘बॉटल ग्रीन हाय स्लीट’, ‘वन शोल्डर मॅक्सी’ असे तिचे पोशाखाचे स्वरूप होते. फॅशन ही गंमतजंमत असते त्यात सांघिक काम असते कारण डिझायनरसह सर्व जण तुम्हाला सजवत असतात, असे तिने ‘फेस टाइम चॅट’मध्ये सांगितले.