ब्राझीलमध्ये एका सोळा वर्षांच्या मुलीवर तीस संशयितांनी बलात्कार केल्यानंतर त्याची ग्राफिक व्हिडिओ ऑनलाइन टाकल्याच्या घृणास्पद व क्रूर घटनेबाबत पोलिसांनी एकाला अटक केल्याचे सांगण्यात. या घटनेवरून ब्राझीलमध्ये मोठय़ा प्रमाणात निदर्शने करण्यात आली. सत्तर लष्करी पोलिस रिओ डी जानिरोच्या पश्चिमकेडील झोपडपट्टय़ांमध्ये गेले व तेथे संशयितांचा कसून तपास केला, तेथे एका संशयिताला अटक करण्यात आली. अटक केलेल्याचे नाव सांगण्यात आलेले नसून त्याचे जाबजबाब चालू आहेत, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित सर्व आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. समाजमाध्यमांवर या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून बुधवारी मुलीचे बेडवर नग्न अवस्थेतील फुटेज हल्लेखोरांनीच टाकले होते. तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांची संख्या ३० ते ३६ पर्यंत सांगण्यात आली आहे. २१ मे रोजी रिओ डी जानिरो येथे हा प्रकार घडला असून तेथे ऑगस्टमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होत आहेत. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना हुडकून काढले जाईल व तुरुंगात टाकले जाईल, असे न्यायमंत्री अलेक्झांर दा मोरायस यांनी रिओ येथे पत्रकार परिषदेत सांगितले. ब्राझीलचे हंगामी अध्यक्ष मायकेल टेमर यांनी सांगितले, की एकविसाव्या शतकात अशा घटना लांच्छनास्पद आहेत. सदर व्हिडिओने देश हादरला असला तरी ब्राझीलमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमी नाही. संयुक्त राष्ट्रांच्या महिला हक्क गटाने म्हटले आहे, की ब्राझीलमध्ये ईशान्येकडील पियाइ भागातही एका सतरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला व आता ही घटना घडली आहे. कट रचून महिलांना जाळ्यात ओढून ही कृत्ये केली जातात, असे संयुक्त राष्ट्रांच्या ब्राझीलमधील महिला हक्क प्रवक्तया नॅदिनी गॅसमन यांनी सांगितले. किशोरवयीन मुलांना अमली पदार्थाच्या जाळ्यातही ओढले जाते. दरम्यान, रिओ येथे मॅचिस्मो कील्स, नो मीन्स नो असे फलक घेऊन महिलांनी मोर्चे काढले तर सावो पावलो येथे निदर्शकांनी ‘माय बॉडी इज नॉट युवर्स, आय लाइक टू वेअर नेक लाइन्स दॅट्स नॉट इन्व्हिटेशन टू रेप मी’ असे लिहिलेली म्युरल्स तयार केली होती.