ब्राझीलमध्ये सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धाच्या वेळी हल्ले करण्याचा कट आखणाऱ्या एका संशयितास अटक करण्यात आली आहे, त्यामुळे अशा कटात अटक केलेल्यांची संख्या ११ झाली आहे. यापूर्वी दहा जणांना अटक करण्यात आली होती, असे ब्राझीलच्या पोलिसांनी सांगितले.

संघराज्या पोलीस विभागाने सांगितले, की एका व्यक्तीस माटो ग्रोसो येथे पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध झाली नाही. न्याय मंत्री अलेझांद्रे द मोरायस यांनी सांगितले, की पोलिसांनी १० जणांना यापूर्वीच अटक केली असून ते आयसिसचे आहेत. त्यांनी समाजमाध्यमांवर ऑलिम्पिक स्पर्धाच्या वेळी हल्ल्याच्या कटाची चर्चा केली होती. आणखी दोघांचा शोध जारी होता. त्यातील एकाला काल अटक करण्यात आली. ऑलिम्पिक स्पर्धावरील हल्ल्यांची चौकशी एप्रिलमध्ये सुरू झाली असून त्यात आयसिसच्या सहानुभूतीदारांना अटक करण्यात आली. पण ते इराक किंवा सीरियाला जाऊन आलेले नाहीत किंवा त्यांना प्रशिक्षणही मिळालेले नाही, त्यांना आयसिसकडून पैसा मिळत होता. चौकशीकर्त्यांनी सांगितले, की संशयितांपैकी कुणीही अरब वंशाचे नसून ते २० ते ४० वयोगटांतील आहेत. एक जण अल्पवयीन आहे. ब्राझीलच्या अंतरिम सरकारच्या लष्करी सल्लागारांनी सांगितले, की दहशतवादाचे सावट कायम आहे. फ्रान्समधील नाइस येथे ट्रक हल्ला झाल्यानंतर ती भीती आणखी वाढली आहे. असे असले तरी ब्राझीलमध्ये दहशतवादाबाबत सतर्कतेची पातळी वाढवण्याचा इशारा दिलेला नाही. गुरुवारी ब्राझीलमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकून पकडण्यात आले. रिओमध्ये शेकडो झोपडपट्टय़ा असून तेथूनच हिंसाचार सुरू होण्याची भीती वाटते आहे. एकूण ८५ हजार पोलीस व सैनिक ऑलिम्पिकच्या वेळी संरक्षणासाठी तैनात केले जाणार आहेत.