स्तनाचा कर्करोग व जीवाणू यांचा संबंध असतो असे नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीच्या वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे, त्यात पराग वैशंपायन या भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचा समावेश आहे. ब्रेस्ट डक्टल मायक्रोबायोम व स्तनाचा कर्करोग यांचा संबंध आहे असे नासाच्या ग्रहीय संरक्षण तंत्रज्ञानाचा वापर करून सांगण्यात आले. स्तनाचा कर्करोग असलेल्या महिलांमधील द्रवात असणारे जीवाणू व कर्करोग नसलेल्या महिलांतील जीवाणू यांच्यात फरक असतो. या जीवाणूंचे अस्तित्व स्तनाच्या उतींमध्ये यापूर्वीही नोंदले गेले असून त्यांचा प्रत्यक्ष संबंध प्रथमच उलगडण्यात आला आहे.

‘ ब्रेस्ट डक्टल सिस्टीममध्ये काही ग्रंथी असतात त्यात दूध तयार होते, त्यातूनच स्तनाग्राच्या दिशेने एक द्रव जात असतो. आरोग्यवान स्त्रियांचे स्तन व कर्करोगग्रस्त स्त्रियांचे स्तन यातील फरक अजून पूर्णपणे माहिती नाही. त्यातील जीवाणूंची भूमिका तर फार अपरिचित आहे’ असे डॉ. सुसान लव्ह रीसर्च फाउंडेशनच्या अधिकारी सुसान लव्ह यांनी सांगितले. त्यांच्या मते स्तनाचा कर्करोग प्रथम स्तनातील पोकळ वाहिन्यांमध्ये सुरू होता व तो नष्ट करणे किंवा मुळात तो ओळखणे सोपे नसते. स्तनातील द्रवात असलेले जीवाणू वेगळे असतात असे २३ आरोग्यवान महिला व २५ कर्करोग ग्रस्त महिलांमध्ये अभ्यासात दिसून आले. जेनोमिक सिक्वेन्सिंग तंत्राने यात जीवाणूंची तपासणी करण्यात आली. ही पद्धत नासाच्या यानांमध्ये जीवाणूंची तपासणी करण्याकरिता वापरली जाते. जीवाणू स्तनाच्या कर्करोगास तारक की मारक ठरतात यावर आता अभ्यासाला चालना मिळणार आहे. कर्करोगग्रस्त स्तन असलेल्या महिलांमध्ये काही वेगळे जीवाणू सापडले असले तरी हे जीवाणू नेमके त्याच महिलांमध्ये कमी जास्त का असतात हे समजलेले नाही. जॉन वायने कॅन्सर सेंटर इन्स्टिटय़ूटच्या डेल्फी ली यांच्या मते प्रतिरक्षा पेशी व अवयवाच्या पृष्ठभागावरील पेशी या जीवाणूंशी सामना करीत असतात. त्या क्रियेतील इन्फेलमेशनमुळे कर्करोग होत असावा. सायंटिफिक रिपोर्ट्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.