निवडणूक आयोग केंद्राकडे शिफारस करणार

पैशांच्या मोबदल्यात मत विकत घेतल्याचा आरोप असलेल्या उमेदवारांना यापुढे कदाचित निवडणूक लढवता येणार नाही. मतदारांना पैशाचे प्रलोभन दाखवणाऱ्या अशा उमेदवारांना अपात्र ठरवून निवडणुकीच्या रिंगणाबाहेरच ठेवण्यात यावे, अशी शिफारस निवडणूक आयोग केंद्र सरकारला लवकरच करणार आहे.

तामिळनाडूतील आर. के. नगर या विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी मतदारांना वैविध्यपूर्ण प्रलोभने दाखविण्यात आल्याचा प्रकार अलीकडेच उघडकीस आला होता. मतदारांना चक्क पैशांचे वाटप करण्यात आले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर निवडणूक आयोगाने येथील पोटनिवडणूक अनिश्चित काळापर्यंत स्थगित केली. निवडणुकीतील या गैरप्रकारांना चाप बसावा, यासाठी आता निवडणूक आयोगाने कठोर आचारसंहिता तयार केली आहे.

केंद्रीय कायदा मंत्रालयाला निवडणूक आयोगाने पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला असून त्यात निवडणुकीत धनशक्तीचा वापर करून मते विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या उमेदवारांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात यावे, अशी शिफारस केली जाणार आहे. आर. के. नगर येथील पोटनिवडणुकीदरम्यान मतदारांना रोख रक्कम वितरित करून, तसेच टोकन, प्रिपेड फोन रिचार्ज कूपन्स, वर्तमानपत्राची वर्गणी, दुधाचे टोकन, बँकांमधील शून्य शिलकीच्या खात्यांमध्ये पैसा टाकणे आणि मोबाइल क्रमांकांसाठी मोबाइल वलेट पेमेंट यासारख्या भेटी देऊन आमिष दाखवण्यात आल्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाला मिळाल्या होत्या.