नासाच्या वैज्ञानिकांना सेरीस या बटू ग्रहावर दुसरा ठळक प्रकाश ठिपका दिसला असून त्यामुळे ते गोंधळात पडले आहेत. दरम्यान, याच वेळी अमेरिकेचे डॉन हे अवकाशयान लघुग्रह पट्टय़ात प्रवेश करून या ग्रहाच्या कक्षेत जाणार आहे, त्यामुळे हे ठळक प्रकाशीय भागाचे गूढ उलगडणार आहे.
 सेरीसपासून ४६००० किलोमीटर अंतरावरून घेतलेल्या छायाचित्रात प्रकाशीय ठिपका दिसत असून, असाच पण काळसर ठिपका सापडला होता असे नासाने म्हटले आहे.
या ग्रहाच्या छायाचित्रांचा विचार करता प्रकाशीय ठिपका नवीन असून, तो त्या ग्रहावरील ज्वालामुखीला सूचित करीत असावा, पण अजून ठळक प्रतिमांची आम्ही वाट पाहात आहोत. त्यानंतरच त्याची भूभौतिक कारणे स्पष्ट होतील असे डॉन मोहिमेचे ख्रिस रसेल यांनी सांगितले.
 ६ मार्चला डॉन अवकाशयान सेरीसच्या कक्षेत जात असून त्याची अधिक ठळक छायाचित्रे मिळवली जातील. आताचा प्रकाशीय ठिपका खूप लहान असून तो टिपणे अवघड आहे. सेरीसवरचा ठिपका इतर ठिपक्यांपेक्षा जास्त प्रकाशमान आहे असे वैज्ञानिक अँड्रियस मॅथ्यूज यांनी सांगितले. २०१२ मध्ये नासाला सेरीसवरून पाण्याच्या वाफा बाहेर पडताना दिसल्या होत्या. त्यामुळे तेथील पाण्यात खनिजे असावीत असा निष्कर्ष काढण्यात आला होता.

डॉन अवकाशयान मोहीम
डॉन हे अवकाशयान २००७ मध्ये नासाने पाठवले असून ते लघुग्रह पट्टय़ात फेरफटका मारणार आहे. मंगळ व गुरू यांच्या दरम्यानचा आकार असलेल्या लघुग्रह पट्टय़ातील दोन घटकांचा ते अभ्यास करणार आहे. डॉन यानाला २०११ मध्ये व्हेस्टा हा सर्वात मोठा लघुग्रह सापडला होता व त्याची मापने व प्रतिमा त्याने पाठवल्या होत्या. २०१२ नंतर यानाने व्हेस्टाची कक्षा सोडली व नंतर सेरीसच्या दिशेने लांबचा प्रवास सुरू केला. सेरीसचा व्यास ९५० किलोमीटर असून व्हेस्टाचा व्यास हा ५२५ किलोमीटर आहे.