काश्मीरमध्ये गुरुवारी ठार मारण्यात आलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी तालिब अफझल शाह हा ‘हुशार विद्यार्थी’ होता आणि त्याचे ध्येय क्रीडा शिक्षक बनण्याचे होते. परंतु सुरक्षा दलांनी सतत ‘छळ’ केल्यामुळे तो दहशतवादी झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला.
पोलिसांवर दगडफेक केल्याच्या आरोपाखाली तालिबला अनेक वेळा तुरुंगात पाठवण्यात आले आणि त्यानंतर सुरक्षा दलांच्या सततच्या छळामुळे त्याने बंदूक उचलली व दहशतवादाची साथ केली, असे तालिबच्या एका जवळच्या नातेवाईकाने सांगितले. दक्षिण काश्मिरातील अस्तान मोहल्ल्याचा रहिवासी असलेल्या २४ वर्षांच्या तालिबने २०११ साली चेन्नई येथून शारीरिक शिक्षणातील पदव्युत्तर पदवी मिळवली. त्याच्या कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार, नंतर त्याने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून इतिहासात पदव्युत्तर मिळवली. दक्षिण काश्मिरातील दहशतवादी संघटनांमध्ये सामील होणारा तो उच्चशिक्षित दहशतवादी होता.
तालिबच्या कुटुंबीयांच्या सांगण्यानुसार, २०१३ साली तालिब परीक्षा देऊ शकला नाही, कारण त्याच दिवशी त्याला एका न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहावे लागले. परीक्षेला बसू न शकल्यामुळे तो दुसऱ्याच दिवशी बेपत्ता झाला आणि दहशतवाद्यांना सामील झाला. पोलीस व सैन्य यांच्या सतत छळामुळे मानसिकदृष्टय़ा सैरभेर झाल्याने त्याने दहशतवादाचा मार्ग चोखाळला, असे त्याच्या चुलतभावाने सांगितले.
मात्र पोलिसांच्या मते, लष्कर-ए-तोयबामध्ये सामील झाल्यानंतर तालिबने अनेक दहशतवादी कारवायांमध्ये भाग घेतला व त्यापूर्वी तो दगडफेकीच्या अनेक घटनांमध्ये सहभागी होता.
तालिबच्या मृत्यूचे वृत्त परिसरात पसरल्यानंतर हजारो लोक अस्तान मोहल्ल्यात गोळा झाले. निदर्शक युवक आणि सुरक्षा दले यांच्यात चकमक उडून पोलिसांच्या कारवाईत अनेक जण जखमी झाले. यापैकी एकाला श्रीनगरमधील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.