युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर; जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का; डेव्हिड कॅमेरून यांची पदत्यागाची घोषणा

युरोपीय संघात राहायचे की बाहेर पडायचे, या मुद्दय़ावर घेतलेल्या सार्वमतात ब्रिटिश जनतेने युरोपीय संघातून बाहेर पडून सवतासुभा मांडण्याच्या बाजूने कौल दिल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक निकालाने युरोपीय संघ तर ढवळून निघाला आहेच, शिवाय जागतिक अर्थव्यवस्थेलाही धक्का बसला आहे. ब्रेग्झिटच्या या प्रलयामुळे जगभरातील भांडवली बाजारांत प्रचंड पडझड झाली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालानंतर ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी पदत्याग करत असल्याचे जाहीर केले. ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडावे यासाठी जोरदार प्रचार करणारे बोरिस जॉन्सन आता पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार आहेत.

युरोपीय संघातून बाहेर पडायचे किंवा कसे याबाबतचा निर्णय सार्वमताद्वारे घेण्याचा निर्णय पंतप्रधान कॅमेरून यांनी घेतला होता. त्यानुसार गुरुवारी ब्रिटनमध्ये सार्वमताची प्रक्रिया पार पडली. इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स, उत्तर आर्यलड आणि जिब्राल्टर या पाचही प्रांतांतील सुमारे तीन कोटी ३५ लाख मतदारांनी या प्रक्रियेत भाग घेतला. त्यापैकी ५१.९ टक्के मतदारांनी ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या बाजूने कौल दिला. ‘युरोपीय संघात राहावे वा बाहेर पडावे’, या दोन्ही बाजूंकडील मतांमध्ये अवघ्या दोन टक्क्यांचे अंतर आहे. ब्रिटन युरोपीय संघातच राहील, अशी सर्वसाधारण अटकळ होती, मात्र प्रत्यक्षात निकाल धक्कादायक लागल्याने युरोपीय देशांसह जगभरात खळबळ उडाली. युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडणे हा दुसऱ्या महायुद्धानंतरचा युरोपला बसलेला सर्वात मोठा धक्का समजला जात आहे.

कॅमेरून यांची निराशा

ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडू नये यासाठी जोरदार प्रचार करणाऱ्या पंतप्रधान कॅमेरून यांची मात्र या निकालाने घोर निराशा झाली आहे. त्यांच्याच हुजूर पक्षातील नेते व लंडनचे माजी महापौर बोरिस जॉन्सन यांनी मात्र ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडणे ब्रिटिश नागरिकांच्या हिताचे कसे आहे, असा प्रचार केला. त्यामुळे या मुद्दय़ावरून सत्ताधारी हुजूर पक्षातच उभी फूट पडल्याचे निदर्शनास आले. या सर्व घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर कॅमेरून यांनी पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे कॅमेरून यांनी गेल्याच वर्षी दुसऱ्यांदा ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. कॅमेरून यांच्यानंतर आता हे पद बोरिस जॉन्सन यांनाच मिळेल, अशी शक्यता आहे. मात्र, त्यांना अर्थमंत्री जॉर्ज ओसबोर्न आणि गृहमंत्री थेरेसा मे यांचे आव्हान असेल. ऑक्टोबरमध्ये हुजूर पक्षाचे अधिवेशन होणार असून त्यात नव्या पंतप्रधानाबाबतचा निर्णय होईल.

युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या ब्रिटिश नागरिकांच्या ऐतिहासिक निर्णयानंतर ब्रिटिश भांडवली बाजार पुरता कोलमडला. स्टर्लिग पौंडात प्रचंड घसरण होऊन ३२ वर्षांपूर्वीची पातळी या चलनाने गाठली. बाजारात उलथापालथ झाली असली तरी देशाची अर्थव्यवस्था सक्षम असून आम्ही या सर्व परिस्थितीसाठी सज्ज आहोत, असे सांगत ब्रिटनच्या मध्यवर्ती बँकेचे प्रमुख गव्हर्नर मार्क कार्नी यांनी उद्योगांना दिलासा  दिला.

तूर्तास ‘जैसे थे’च

युरोपीय संघातून बाहेर पडून ब्रिटनने सवतासुभा मांडण्याचा निर्णय घेतला असला तरी तातडीने प्रस्थापित व्यवस्थेत बदल होणार नसल्याचे पंतप्रधान कॅमेरून यांनी स्पष्ट केले. सद्य:स्थितीत युरोपीय देशांचे नागरिक ब्रिटनमध्ये मुक्त प्रवास करू शकतात, तसेच त्यांच्या मालवाहतूक वा तत्सम कोणत्याही व्यवहारांमध्ये तूर्तास बदल होणार नसल्याचे कॅमेरून म्हणाले.

 

सार्वमताच्या या निर्णयानंतरही ब्रिटनची अर्थव्यवस्था सशक्तच राहील, याची हमी मी जगाला देतो. आता पुढील प्रक्रियेसाठी नव्या नेतृत्वाची गरज असून मी पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार आहे. यापुढेही देशाची सेवा करण्यास मी तत्पर असेन.

– डेव्हिड कॅमेरून, ब्रिटनचे पंतप्रधान

 

ब्रिटनच्या निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होणार नाही. अर्थव्यवस्था मजबूत असून चिंतेचे कारण नाही.

– अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री

 

ब्रिटन युरोपीय संघातून बाहेर पडला असला तरी संघातील इतर २७ सदस्य देशांची युती अभेद्य आहे. ‘ब्रेग्झिट’ची लागण इतरांना होणार नाही, अशी मी आशा बाळगतो. युरोपीय संघ ही जगातील एक बलाढय़ बाजारपेठ आहे.

– मार्टिन शुल्झ, युरोपीय संघ पार्लमेंटचे अध्यक्ष

 

परिणाम..

कॅमेरून यांचा पदत्याग!

ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडू नये यासाठी जोरदार प्रचार करणाऱ्या पंतप्रधान कॅमेरून यांची मात्र या निकालाने घोर निराशा झाली आहे.  या सर्व घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर कॅमेरून यांनी पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

सेन्सेक्स कोसळला

युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या ब्रिटनच्या शिक्कामोर्तबाचे अपेक्षित पडसाद येथील भांडवली बाजारावर सप्ताहअखेरच्या व्यवहारात मोठय़ा घसरणीद्वारे पडले. सकाळच्या निकालाची प्रतिक्रिया व्यवहारात १,१०० अंशांच्या आपटीने नोंदविणारा सेन्सेक्स दिवसअखेर काहीसा सावरत मात्र २६,४००च्या आत विसावला. ब्रिटनशी संबंधित भारतीय कंपन्यांच्या समभागांवरही दोन्ही प्रमुख बाजारात  परिणाम नोंदला गेला.

सोने, चांदी दरात मोठी उसळी

मुंबईच्या सराफा बाजारात सोने तसेच चांदीच्या दरांमध्ये शुक्रवारी मोठी दर उसळी नोंदली गेली. शहरात तोळ्यामागे एकाच सत्रात तब्बल १,२२५ रुपयांची झेप घेणाऱ्या सोन्याचा भाव थेट ३० हजारांपुढे पोहोचला. तर चांदीचा किलोचा भाव व्यवहारात गुरुवारच्या तुलनेत १,५७५ रुपयांनी उंचावत ४२,९३० रुपयांवर गेला.

युरोपीय बाजारात पडझड

‘ब्रेग्झिट’ निकालाचे धक्के जागतिक भांडवली बाजारालाही बसले. युरोपातील प्रमुख निर्देशांकांसह आशियातील प्रमुख निर्देशांक शुक्रवारी ८ टक्क्यांपर्यंत घसरले. होते. अमेरिकेतील सुरुवातीचे व्यवहार तेजीचे झाले असले तरी युरोपातील डॅक, कॅक ४० हे प्रमुख निर्देशांक दुपापर्यंत घसरता प्रवास नोंदवीत होते.

 

Untitled-22

 

Untitled-23