ब्रिटनने अर्जेटिनावर गेली अनेक वर्षे हेरगिरी केली कारण तो देश फॉकलंड बेटे परत घेईल अशी भीती त्यांना वाटत होती, असा गौप्यस्फोट अमेरिकी जागल्या एडवर्ड स्नोडेन याने केला आहे.
स्नोडेन याने सांगितले की, ब्रिटनने २००६ ते २०११ दरम्यान अर्जेटिनावर हेरगिरी केली. ब्रिटनला अशी भीती वाटत होती की, फॉकलंड बेटे ताब्यात घेण्यासाठी अर्जेटिना परत आक्रमण करू शकतो व त्यावेळी अर्जेटिनातील प्रसारमाध्यमातून तशा बातम्याही येत होत्या.
अर्जेटिना व ब्रिटन यांच्यात १९८२ मध्ये फॉकलंड बेटांवरून युद्ध झाले होते. सीआयएचा माजी कर्मचारी असलेला व सध्या रशियात असलेला स्नोडेन याने अमेरिकी टेहळणी कार्यक्रमातील गुप्त माहिती फोडली असून त्याला अमेरिकेने फरारी घोषित केले आहे. अर्जेटिना व ब्रिटन यांनी या आरोपावर अजून अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दक्षिण अमेरिकेतील वृत्तसंस्थांनी ही बातमी दिली आहे.
ब्रिटनने अर्जेटिनाच्या संगणकात व्हायरस सोडून विशिष्ट प्रचार केला व गुप्तचर माहिती मिळवली, अर्जेटिना सरकारला हानी पोहोचेल अशी काही कृत्ये केली.